खुडाणे ग्रामपंचायतीतर्फे "टॉयलेट : एक प्रेमकथा"...

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांचे विशेष प्रबोधन...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीतर्फे काल (ता.28) रात्री 8 वाजता येथील संत सावता महाराज मंदिरात ग्रामस्थांसाठी "टॉयलेट- एक प्रेमकथा" हा प्रबोधनपर चित्रपट दाखविण्यात आला. गावात शंभर टक्के शौचालयनिर्मिती होऊन गाव हागणदारीमुक्त व्हावे म्हणून सरपंच कल्पना गवळे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा, प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला.

संरपच कल्पना गवळे ह्यांनी स्वत: घरोघरी जाऊन, महिलांना एकत्र जमवून हा चित्रपट दाखविला. गावातील पुरुषांपेक्षाही आधी सर्व महिलांमध्ये घरोघरी शौचालय निर्माण करण्याचे विचार रुजावेत हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास गावातील अबालवृद्धांसह महिला व पुरुषांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. 
सन 2015 पर्यंत खुडाणे गावात 700 कुटुंबांपैकी केवळ 70 कुटुंबांकडेच स्वछतागृहे होती. पंरतु मागील दोन वर्षात ग्रामपंचायतीच्या सततच्या प्रोत्साहनामुळे 380 कुटुंबांनी शौचालये बांधली. अजूनही 250 कुटुंबांनी स्वछतागृहे बांधावीत हे ग्रामपंचायतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

त्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे गावात विविध विधायक उपक्रम घेतले जात असून गावकऱ्यांत जनजागृतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभिनेता अक्षयकुमार ची मुख्य भूमिका असलेला 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा चित्रपट ग्रामस्थांना दाखविण्यात आला. कार्यक्रमास संरपच कल्पना गवळे, उपसंरपच नामदेव गवळे, ग्रामसेवक श्री. मोहिते, महेश बाविस्कर, पराग माळी आदींसह ग्रामपंचायत सदस्य, अबालवृद्ध, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...