बेभान होऊन काम करा, यश तुमचेच : जयवंतराव ठाकरे

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

साक्री येथे प्रा.संदीप बेडसे मित्र परिवारातर्फे दीपावली स्नेहमीलन मेळावा.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : प्रा. संदीप बेडसे तुम्ही आगामी विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा, यश तुमचेच आहे" असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांनी केले. साक्री येथील राजे लॉन्स मंगल कार्यालयात प्रा. संदीप बेडसे मित्र परिवारातर्फे आयोजित शिक्षक व संस्थाचालकांच्या दीपावली स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. 'टीडीएफ'चे ज्येष्ठ नेते वि. मा. भामरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, प्रा. संदीप बेडसे, 'टीडीएफ'चे ज्येष्ठ नेते बी. एस. पाटील, डी. जे. मराठे, संजय पवार, जे. एम. भामरे, प्रकाश सोनवणे, एस. के. चौधरी, विजय बोरसे, पोपटराव सोनवणे, प्रभाकर बच्छाव, उत्तमराव देसले, ऍड. गजेंद्र भोसले, सयाजी अहिरराव, सरपंच संजय खैरनार, डॉ. एन. डी. नांद्रे, डॉ. राजेंद्र अहिरे, डॉ. अजिंक्य देसले, माजी प्राचार्य एस. एन. खैरनार, दीपक बेडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर ज्ञानेश्वर नागरे, विलास बिरारीस, सुरेश सोनवणे, हर्षवर्धन दहिते, उत्पल नांद्रे, प्रदीप नांद्रे, जितेंद्र मराठे, पंडित बेडसे, सचिन बेडसे आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते म्हणाले की, मागील विधानसभेच्या निवडणुकीत आपण प्रा. संदीप बेडसे यांना मदत करू शकलो नाहीत पण यावेळेस पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.
ज्येष्ठ नेते बी. एस. पाटील म्हणाले की, संदीप बेडसे यांच्यात जरी निवडून येण्याची क्षमता असली तरी गाफील राहून चालणार नाही. 'टीडीएफ'तर्फे उमेदवारीचे संदीप बेडसे हे प्रबळ दावेदार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात 'टीडीएफ'तर्फे उमेदवारी निश्चितच प्रा.संदीप बेडसे यांनाच मिळेल यात काडीमात्र शंका नाही असेही ते म्हणाले.

मतदारांना भावनिक आवाहन...
प्रा. संदीप बेडसे यांचे वडील स्व. त्र्यंबकराव बेडसे यांनी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे 'टीडीएफ'चे कार्य केले आहे. परंतु त्यांना आमदारकीची संधी मिळाली नाही. प्रा. संदीप बेडसे यांच्या रूपाने दुसऱ्या पिढीला ती संधी देणे आवश्यक आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे भावनिक आवाहनही यावेळी वि.मा.भामरे यांनी केले.

राजकारण नव्हे तर समाजकारण हा आपला मूळ पिंड
शेवटी बोलताना प्रा.संदीप बेडसे म्हणाले की, राजकारण नव्हे तर समाजकारण हा आपला मूळ पिंड आहे. केवळ समाजसेवा करण्यासाठीच लठ्ठ पगाराची सरकारी नोकरी सोडून मी गावाकडे आलो आहे. विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि शिक्षकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे. आपले पाठबळ राहिले तर तेही अशक्य नाही असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी आमदार अमरीशभाई पटेल, रोहिदास पाटील, राजवर्धन कदमबांडे, चंद्रकांत रघुवंशी, जयवंतराव ठाकरे, शिवाजी दहिते, पोपटराव सोनवणे, सुरेश पाटील आदींसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगर ह्या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आपल्याला भक्कम पाठबळ असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जे. यू. ठाकरे, शिवाजी दहिते, वि. मा. भामरे, प्रा.संदीप बेडसे, प्रा.दीपक बेडसे, प्रा.भगवान जगदाळे, पंडित बेडसे, जितेंद्र मराठे, डी. जे. मराठे, ऍड.गजेंद्र भोसले, पोपटराव सोनवणे, एस. के. चौधरी, प्रकाश सोनवणे, डॉ.एन.डी.नांद्रे, सरपंच संजय खैरनार आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी प्राचार्य एस. एन. खैरनार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे यांनी आभार मानले. मेळाव्यास साक्री तालुक्यातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. संदीप बेडसे यांच्या मित्र परिवाराने शिक्षक स्नेहमीलन मेळाव्याचे आयोजन केले होते.