जखमी अवस्थेतही 'त्याने' दिला दहावीचा पेपर

निजामपूर (ता.साक्री) : अपघातात  जखमी झालेल्या अवस्थेतही दहावीचा विज्ञान-१  विषयाचा पेपर देताना आदर्श विद्या मंदिराचा विद्यार्थी योगेश कारंडे. शेजारी विचारपूस करताना केंद्र संचालक आर. सी. सोनवणे, छोटू भदाणे आदी.
निजामपूर (ता.साक्री) : अपघातात जखमी झालेल्या अवस्थेतही दहावीचा विज्ञान-१ विषयाचा पेपर देताना आदर्श विद्या मंदिराचा विद्यार्थी योगेश कारंडे. शेजारी विचारपूस करताना केंद्र संचालक आर. सी. सोनवणे, छोटू भदाणे आदी.

निजामपूर-जैताणे (धुळे) : नवागाव (ता. साक्री) येथील रहिवासी व येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी योगेश नत्थू कारंडे (वय १५) हा मोटारसायकल अपघातात जखमी होऊनही मनोबल खचू न देता त्याने जखमी अवस्थेतच आज (बुधवार) निजामपूर केंद्रावर दहावीच्या बोर्डाचा विज्ञान विषयाचा पेपर दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

योगेश कारंडे हा आज सकाळी नऊच्या सुमारास दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर देण्यासाठी नवागावहून मित्राच्या मोटारसायकलने निजामपूर केंद्रावर येत असताना भामेर रस्त्यावरील पीरबाबाजवळ समोरून येणाऱ्या मिनिडोअरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरून रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन तो जखमी झाला.

घटनेची माहिती कळताच भामेर व नवागाव येथील दोन्ही विद्यार्थ्यांसह योगेशचे काका मोतीलाल ठेलारी यांनी जखमी अवस्थेत त्याला निजामपूर येथील डॉ. रमेश येवले ह्यांच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. उजव्या पायाच्या गुढग्याजवळ जखमी झालेल्या योगेशला मुका मारही बसला होता. जखमेवर तीन टाके घालून डॉ. येवले यांनी त्याच्यावर औषधोपचारासह प्राथमिक उपचार केले व त्यास विश्रांतीचा सल्ला दिला. परंतु, दहावीचे महत्वाचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून न खचता योगेशने आजचा विज्ञान-१ विषयाचा पेपर देण्याचे मनोबल तयार केले व मोठया हिमतीने तो बोर्डाच्या परीक्षेला सामोरा गेला.

परीक्षेसाठी खोली क्रमांक पाचमध्ये आसनस्थ योगेशची पर्यवेक्षकांसह केंद्र संचालक आर. सी. सोनवणे, केंद्र उपसंचालक राजेंद्र जाधव, अमरीश खैरनार, शाळेचे मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, प्रा. भगवान जगदाळे, छोटू भदाणे, गणेश निकुंभ, डॉ. रमेश येवले, वर्गमित्र सखाराम गोयकर आदींसह मित्र-मैत्रिणींनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com