शेतकऱ्यांना फसवाल, तर राज्य गमावून बसाल - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

धुळे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पाळावे; अन्यथा त्यांना 2019 नंतर लाल किल्ल्यावरून भाषण करता येणार नाही. शेतकऱ्यांना फसवाल, तर राज्य गमावून बसाल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केंद्रासह राज्य सरकारला दिला.

धुळे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पाळावे; अन्यथा त्यांना 2019 नंतर लाल किल्ल्यावरून भाषण करता येणार नाही. शेतकऱ्यांना फसवाल, तर राज्य गमावून बसाल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केंद्रासह राज्य सरकारला दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना विक्रमी 34 हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावाही धादांत खोटा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
अखिल भारतीय किसान संघर्ष यात्रेचे आज धुळ्यात आगमन झाले. यानंतर दुपारी येथील हिरे भवनामध्ये खानदेशस्तरीय कर्जमुक्ती परिषद झाली. खासदार शेट्टी, यात्रेचे समन्वयक व्ही. एम. सिंग, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम, जय किसान आंदोलनाचे योगेंद्र यादव, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर आदी उपस्थित होते.

परिषदेत शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी 2014 च्या निवडणुकीत शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते त्यांनी तीन वर्षे झाली तरी पाळलेले नाही. एका आश्‍वासनाने निवडणुका संपत नाहीत, हे मात्र त्यांनी ध्यानात घ्यावे. 2019 नंतर त्यांना लाल किल्ल्यावरून भाषण करता येणार नाही. शेतकऱ्यांनी ठरवले, तर ज्या महाराष्ट्रात त्यांना 48 पैकी 42 खासदार मिळाले तेथे त्यांची अवस्था कॉंग्रेससारखी करून टाकू. शेतकऱ्यांना फसवाल, तर राज्य गमावून बसाल.'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत "मते मागायला या... मग "साले कोण' ते सांगतो,' असा टोलाही खासदार शेट्टी यांनी लगावला.

कर्जमाफीची आकडेवारी खोटी
राज्यातील शेतकऱ्यांना विक्रमी 34 हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा हा धादांत खोटा असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. कर्जमाफीच्या यादीत मृत शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे. राज्यात एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांवर एकूण 60 हजार कोटींचे कर्ज असल्याचा आकडा आहे. त्यातून 34 हजार कोटी कर्जमाफी वजा केली, तर फक्त 26 हजार कोटीच उरले असते व आनंदी-आनंद राहिला असता. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. आठ-दहा हजार कोटींत शेतकऱ्यांना गुंडाळले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सांगावी, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.