'फिरत्या नारळा'तून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथे रविवारी (ता.10) फिरत्या नारळाच्या कार्यक्रमात प्रवचन, कीर्तन, भजन, संगीत, नाटक, हरिपाठ, गीतापाठ, रथयात्रा, पदयात्रा आदींच्या माध्यमातून जातीय सलोखा, सामाजिक, धार्मिक संघटन, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथे रविवारी (ता.10) फिरत्या नारळाच्या कार्यक्रमात प्रवचन, कीर्तन, भजन, संगीत, नाटक, हरिपाठ, गीतापाठ, रथयात्रा, पदयात्रा आदींच्या माध्यमातून जातीय सलोखा, सामाजिक, धार्मिक संघटन, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.

मुंबईच्या वीरभद्र कलापथकाने सादर केलेले 'भक्त पुंडलिक' हे नाटक, हभप. मच्छिन्द्र महाराज (वाडीभोकर), हभप. विश्वनाथ महाराज (तळवाडे) व हभप. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांच्या जाहीर कीर्तन व प्रवचनांचा समावेश आहे. यावेळी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान संत निवृत्तीनाथ महाराज, जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, हभप. कृष्णाजी गुरुजी यांच्यासह संतांचे अखंड स्मरण करण्यात आले. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे आवाहनही करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता. वारकरी संप्रदायाच्या प्रणेत्या ह.भ.प. यशोदा आक्का यांची प्रमुख उपस्थिती होती.

गावातून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची भव्य रथयात्रा काढण्यात आली. त्यात महिला व पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले होते. दुपारी दोनपासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे नियोजन केले होते. खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक ह्या चारही जिल्ह्यांसह विशेषतः मध्यप्रदेश, गुजरात व माळमाथा परिसरातील आबालवृद्ध व महिलांसह हजारो भाविकांनी महाप्रसादाचा व मुख्य कार्यक्रमाचा लाभ घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे पस्तीस ते चाळीस हजारांपेक्षाही जास्त भाविकांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. निजामपूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

गेल्या महिनाभरापासून संयोजन समिती, निजामपूर ग्रामस्थ व भजनीमंडळ अहोरात्र परिश्रम घेत होते. त्याची फलश्रुती भाविकांना आज "याचि देही, याचि डोळा" पहायला मिळाली. मुख्य कार्यक्रम एस. के. नगरमधील भव्य मैदानावर झाला. तेथे भव्य शामियाना अर्थात मंडप उभारण्यात आला होता. तर महाप्रसादाची व पार्किंगची सोय साक्री-नंदुरबार रस्त्यावरील पेट्रोल पंप समोरील खाजगी मालकीच्या दोन मोठ्या जागांवर करण्यात आली होती. दिव्यांग भगिनी सौ. जया दीपक देवरे हिने चितारलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या भव्य रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दिव्यांग असूनही रात्री साडेअकरा पासून ते सकाळी सातपर्यंत ती अविरत परिश्रम घेत होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निजामपूर ग्रामपंचायत, संयोजन समिती, भजनी मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: dhule news religious program in nijampur