...म्हणून मीच खरा लाभार्थी

संजय मुरलीधर ओझरकर
संजय मुरलीधर ओझरकर

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील भामेर (ता. साक्री) येथील रहिवासी व भामेरच्या विविध कार्यकारी सोसायटीत सन 2009 पासून शिपाई पदावर कार्यरत असलेल्या संजय मुरलीधर ओझरकर (वय 47) हे दरमहा सहाशे रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. थकीत मानधनही त्यांना गेल्या अठरा महिन्यांपासून न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची व शासकीय योजनेचा "मीच खरा लाभार्थी" असे म्हणायची वेळ आली आहे.

एका बाजूला हजारो व लाखो रुपये मासिक वेतन असतानाही सातव्या वेतन आयोगाची मागणी करणारे केंद्र व राज्याचे सरकारी कर्मचारी कुठे व केवळ दरमहा सहाशे रुपये थकीत मानधनाची मागणी करणारे राज्य सहकारी विभागाचे शिपाई संजय ओझरकर कुठे. केवढी ही विषमता. वीस रुपये रोजची कामे करुन जीवन जगणारी माणसे देखील आहेत या जगात. विशेष म्हणजे वैद्यकीय सल्ल्यानुसार संजय ओझरकर हे शारीरिक दृष्टीने कुपोषित श्रेणीत मोडतात, असेही त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत त्यांची ड्युटी असते. एक मुलगा व चार मुली असा त्यांचा परिवार असून त्यांची पत्नीही मोलमजुरी करून त्यांना संसारात उदरनिर्वाहास हातभार लावते. परंतु, एवढ्याशा तुटपुंज्या उत्पन्नावर मुला-मुलींचे शिक्षण व पालनपोषण कसे करावे हा त्यांच्यापुढील खरा गहन प्रश्न आहे. गावशिवारात त्यांच्या मालकीची सुमारे एक हेक्टर कोरडवाहू शेतजमीन असून, त्यातही भाऊबंदकीचा वाद असल्याने मालकी हक्कासाठी त्यांची साक्री कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. परंतु, त्यांच्याकडे वेळेवर वकीलास देण्यासाठी फी नाही. एकदा भामेर भेटीवर असताना साक्रीच्या तहसीलदारांकडेही त्यांनी आपली कैफियत मांडली होती. त्यांनीही मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती श्री. ओझरकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या श्री. ओझरकरांनी आपले दरमहा सहाशेप्रमाणे अठरा महिन्याचे थकीत मानधन मिळावे व येथून पुढे किमान तीन हजार रुपये मासिक मानधन मिळावे अशीही मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com