जैताणेत अज्ञात आजाराने हजारो मेंढ्या मृत्यूमुखी

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञात आजाराने हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. शवविच्छेदनासह पंचनामा, उपचार व औषध पुरवठ्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने अखेरीस कंटाळून उपसरपंच आबा भलकारे व ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे आदींसह संतप्त मेंढपाळ बांधवांनी आज सकाळी दहाच्या सुमारास रुग्णालयास टाळे ठोकले.

त्यानंतर संबंधित संतप्त मेंढपाळांनी थेट जैताणे ग्रामपंचायत कार्यालय गाठले व सरपंच संजय खैरनार यांच्याकडे आपली व्यथा मांडली. सरपंच श्री. खैरनार यांनी त्यांची समजूत काढत ग्रामपंचायतीतर्फे आपणही याचा कृषी व पशुसंवर्धन सभापती लीलावती बेडसे यांच्यासह वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. त्यांनतर अकराच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यात पशुवैद्यकीय उपायुक्त डॉ. एस. सी. शिरसाठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज रापतवार, जिल्हा चिकित्सक डॉ. पी. जी. कोमलवार, तालुका पशुधन विस्तार अधिकारी तथा साक्रीचे प्रभारी बीडीओ डॉ. ऋतुराज कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. मयूर कडवे, सहाय्यक पशुधन विस्तार अधिकारी डॉ. हंसराज देवरे, जैताणेच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. अश्विनी गिरीगोसावी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. आर. डी. गावीत आदींचा समावेश होता.

अधिकाऱ्यांची मेंढपाळांशी चर्चा...
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी येताच सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे आदींसह मेंढपाळांशी घडलेल्या घटनेबद्दल चर्चा केली. सुरुवातीला मेंढपाळांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले परंतु अधिकाऱ्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत समजूत काढली तेव्हा ते शांत झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी मेंढपाळांना मेंढ्यांची काळजी घेणेसंदर्भात मार्गदर्शन व सूचना केली.

वाड्यांवर जाऊन केले शवविच्छेदन...
त्यांनतर संबंधित पथकाने त्वरित मेंढपाळांच्या वाड्यांवर जाऊन मेंढ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले व तपासणी करून उपचारही केले. तसेच मृत मेंढ्यांचे ताबडतोब शवविच्छेदन केले. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज रापतवार यांच्याशी संपर्क साधला असता "संबंधित रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिक व पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रतिबंधक उपाययोजना केली जाणार आहे. दरम्यान ही साथ आटोक्यात येईपर्यंत एक पशुधन विकास अधिकारी व दोन पशुधन पर्यवेक्षक अशा तीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद दलही जैताणेत नेमण्यात आले आहे." अशी माहिती त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

स्थानिक कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांचा आरोप...
आतापर्यंत परिसरात सुमारे दीड दोन हजार मेंढ्या अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्या असून रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नाही. येथील कर्मचारी त्या सरकारी औषधांची चढ्या दराने विक्री करतात व उडवाउडवीची उत्तरे देतात. बाहेरील खाजगी मेडीकल दुकांनांवरही ही औषधे महागडी मिळतात. दररोज किमान शंभर ते दीडशे मेंढ्या मृत्युमुखी पडत असून प्रत्येक मेंढपाळाच्या किमान चाळीस ते पन्नास मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत. एका मेंढीची सरासरी किंमत दहा हजार रुपये असून परिसरातील सुमारे शंभर मेंढपाळांचे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मेंढपाळांवर आत्महत्येची वेळ आली आहे." अशी शोकांतिका पीडितांनी मांडली...

आंदोलनाचा इशारा...
परिसरात मृत मेंढ्यांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रुग्णालय इमारतीचीही दुर्दशा झाली असून आगामी काळात मेंढपाळांना नुकसान भरपाईसह मेंढ्यांना वेळेवर पशुवैद्यकीय सुविधा व औषधी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे आदींसह मेंढपाळ व ग्रामस्थांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com