आता वेध फक्त शिक्षक आमदारकीचे...

संदीप बेडसे
संदीप बेडसे

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या पाचही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. टीडीएफ, शिक्षक परिषद, शिक्षक भारती आणि शिक्षक सेनेसह विविध राजकीय, सामाजिक व शिक्षक संघटनेच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यातही धुळे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व शिरपूर येथील आर.सी. पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा.संदीप बेडसे यांनी आतापासूनच जोरदार शक्तिप्रदर्शन व मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या नावाला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून पसंती व समर्थन मिळत आहे.

विधान परिषदेत शिक्षक आमदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात 15 तालुके, नगर जिल्ह्यात 14 तालुके, जळगाव जिल्ह्यात 13 तालुके, नंदुरबार जिल्ह्यात 6 तालुके तर धुळे जिल्ह्यात 4 तालुके असा एकूण 52 तालुक्यांचा नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ. त्यातही पुन्हा ग्रामीण आणि शहरी मिळून 55 आमदार व 5 खासदारांचे कार्यक्षेत्र असलेला भव्य असा हा मतदारसंघ. मागच्या वेळेस नाशिक जिल्ह्याला डॉ.अपूर्व हिरे यांच्या रुपाने विधान परिषदेत प्रतिनिधीत्व मिळाले होते. त्यामुळे ह्यावेळी नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्याला हे प्रतिनिधीत्व मिळावे असा सूर उमटताना दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळाली पाहिजे असे काहींचे मत आहे. या निवडणुकीत शिक्षक संघटनांची व संस्थाचालकांची भूमिका अतिशय निर्णायक असते. राजकीय पक्ष आपले स्वतंत्र उमेदवार देतात की शिक्षक संघटनांच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

यापूर्वी धुळे जिल्ह्यातून माजी शिक्षक आमदार जे.यू. ठाकरे, जळगाव जिल्ह्यातून माजी आमदार दिलीपराव सोनवणे, श्री.चौधरी, नाशिक जिल्ह्यातून माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, टी.एफ.पवार, नगर जिल्ह्यातून माजी आमदार श्री.शिंदे आदींनी प्रतिनिधित्व केले आहे. सद्या 'टीडीएफ'सह अन्य शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांसमवेत जिल्हा पातळीवर बैठका होत असून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. त्यातही अन्य उमेदवारांच्या तुलनेत 'टीडीएफ'चा उमेदवार हा आमदारकीचा प्रमुख दावेदार मानला जातो. परंतु अनेकदा 'टीडीएफ'मध्येही फूट पडल्याचे व बंडखोरी झाल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहे. येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'टीडीएफ' उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. त्यात पुन्हा अपक्षांची भाऊगर्दी. त्यामुळे प्रत्येक पक्ष, संघटनेची अधिकृत उमेदवारी नेमकी कोणाला मिळते याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकवर्गाचे लक्ष लागून आहे.

विद्यमान शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांच्या कार्यशैलीवर शिक्षकवर्गाची नाराजी आहे. त्यामुळे ह्यावेळी शिक्षकांना शिक्षकांच्या समस्या सोडविणारा झुंजार शिक्षक आमदार हवाय. या निवडणुकीत जातीपातीच्या व गटातटाच्या संकुचित राजकारणाला कुठेही थारा नसतो. कारण इथे मतदार हा 'फक्त शिक्षक' असतो. आणि शिक्षक मतदार हा अतिशय चिकित्सक असतो. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत 'मतदार' म्हणून शिक्षक हाच निकष आहे परंतु 'उमेदवार' म्हणून शिक्षक हाच निकष नसल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रा. संदीप बेडसे हे धुळे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून त्यांना 'टीडीएफ'तर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 'टीडीएफ'मधील इच्छुकांमध्ये त्यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. त्यांचे वडील स्व.त्र्यंबकराव बेडसे यांनी 40 ते 45 वर्षे 'टीडीएफ'चे कार्य केले आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू कार्यकर्ते असून माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

'टीडीएफ'तर्फे उमेदवारीसाठी माजी आमदार व स्वातंत्र्यसेनानी व्यंकटराव रणधीर यांचे नातू, शिरपूरचे किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव, ग.स.बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक निशांत विश्वासराव रंधे, मालेगावचे आर.डी.निकम, रवींद्र मोरे, चंद्रकांत कुशारे, एस.बी.देशमुख, एस.बी.शिरसाठ, जळगावचे एस.डी.भिरुड आदीही इच्छुक आहेत. शिक्षक परिषदेतर्फे धुळ्याचे भरतसिंग भदोरीया, नगरचे सुनील पंडित, नाशिकचे दत्ता वाघे-पाटील, दिलीप अहिरे, गुलाब भामरे आदी इच्छुक आहेत. शिक्षक भारतीतर्फे नाशिकचे के.के.अहिरे, राजेंद्र लोंढे, साहेबराव कुटे आदी इच्छुक आहेत. शिक्षक सेनेतर्फे नाशिकचे संजय चव्हाण इच्छुक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून अल्पसंख्याक उमेदवार मजहर शेख इच्छुक आहेत. धुळे येथील म्युनिसिपल हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय सचिव विलासराव पाटील हेही काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनीही आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. किमान 10 ते 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात  नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

6 नोव्हेंबरपर्यंत अद्ययावत मतदारयादीत नावनोंदणीचे आवाहन...
6 नोव्हेंबरपर्यंत ज्यांची शिक्षक म्हणून किमान तीन वर्षे पूर्णवेळ मान्यताप्राप्त सेवा झाली असेल अशा सर्व शिक्षकांना (बिगर मान्यताप्राप्त शिक्षक व झेडपीचे प्राथमिक शिक्षक वगळून) आपली नावे अद्ययावत मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. बऱ्याचदा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमार्फत हे नावनोंदणी फॉर्म भरून घेतले जातात. उमेदवार, संघटना अथवा पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिक्षक मतदारांवर प्रभाव पडू नये म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकांचे फॉर्म शाळा, महाविद्यालयांमार्फत भरून घ्यावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत हे नावनोंदणी फॉर्म उपलब्ध असून फॉर्म भरल्यानंतर ते वेळेत जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबत एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार कार्ड अथवा मतदान कार्डाची झेरॉक्स प्रत, सेवेचा दाखला, विनंती पत्र आदी अचूक माहिती भरून फॉर्म जमा करण्याबाबतही कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com