'संकल्प से सिध्दी' उपक्रमांतर्गत भाजपची न्याय, समानतेची शपथ

एल. बी. चौधरी
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सोनगीर (जिल्हा धुळे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी संकल्प से सिध्दी (2017 ते 2022) उपक्रमांतर्गत आज (ता. 26) संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गरीबी, बेरोजगारी, आतंकवाद, जातीयवाद हटविण्यासाठी तसेच सर्वांना न्याय, विकास, समानता, स्वच्छतेचा हक्क मिळावा यासाठी संकल्प करण्याची शपथ घेतली.

सोनगीर (जिल्हा धुळे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी संकल्प से सिध्दी (2017 ते 2022) उपक्रमांतर्गत आज (ता. 26) संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गरीबी, बेरोजगारी, आतंकवाद, जातीयवाद हटविण्यासाठी तसेच सर्वांना न्याय, विकास, समानता, स्वच्छतेचा हक्क मिळावा यासाठी संकल्प करण्याची शपथ घेतली.

देशाला स्वातंत्र्य मिळाले पण अजूनही सुराज्य मिळाले नाही. ते मिळविण्यासाठी व देशाला जगाचे गुरू बनविण्याचा पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांना सर्वांचे सहकार्य मिळावे असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात कार्यकर्त्यांना संकल्प से सिध्दी उपक्रमाची माहिती देण्यासाठी डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

एनडीएच्या तीन वर्षांतील विकासकामाची त्यांनी माहिती दिली. व्यासपीठावर भाजपाचे धुळे जिल्हा अध्यक्ष अनूप अग्रवाल, ग्रामीणचे अध्यक्ष बबन चौधरी, माजी जिल्हा अध्यक्ष लखन भतवाल, संघटन सचिव विजय पाच्छापूरकर, किशोर संघवी, आनंदा पाटील, रत्ना बडगुजर, राम भदाणे, भारती माळी, कुणाल चौधरी आदी उपस्थित होते. 

डॉ. भामरे म्हणाले की सुराज्यसाठी पंतप्रधान मोदी 18 तास काम करतात. 1942 मध्ये चलेजाव चळवळ उभी राहिली. देश स्वतंत्र करण्याचा संकल्प जनतेने सोडला तो 1947 मध्ये पाच वर्षांत पूर्ण झाला. तसाच सुराज्यचा संकल्प 2017 मध्ये करून 2022 पर्यंत तडीस आणायचा आहे. 

तीन वर्षांत एकाही मैत्रीवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. असे सांगून डॉ. भामरे म्हणाले की 134 वेगवेगळ्या योजनेचे 80 हजार कोटी रुपये लाभार्थीला थेट मिळाले. भ्रष्टाचारात बुडालेल्या 80 कोळसा खाणीचा आॅनलाईन लिलाव करून तसेच, टू जी स्पेक्ट्रम मधून चार लाख कोटी रुपये मिळविले. जनधन योजनेत 29 कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. हा जागतिक विक्रम झाला. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत 12 रुपयात दोन लाख रुपये विमा मिळतो. वार्षिक 330 रुपये भरल्यास आजारात दोन लाख मिळेल. कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करतांना विमा योजनेत गरीबांची नोंद करा. असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. नोटबंदीतून तीन लाख कोटी रुपये बाहेर आले त्यापैकी दोन लाख कोटी रुपयांबाबत संशय कायम आहे. वीस लाख टॅक्स भरणारे वाढले. हवाला रॅकेट कमी झाले. डिजिटल इंडिया कडे वाटचाल सुरू झाली. जीएसटी मुळे करप्रणालीत सुसूत्रता आली. अटल पेन्शन योजना जनतेस लाभदायक ठरली. विकासदर दीड हून सात टक्के झाला. सर्वांसाठी वेगवेगळ्या 70 योजना आहेत. 

धुळे जिल्ह्य़ातील विकासाबाबत ते म्हणाले की चाळीस वर्षापासूनची मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची मागणी मंजूर झाली. लवकरच भूमीपूजन होऊन कामास सुरुवात होईल. दिल्ली मुंबई कॅरिडॉर, चार नवीन महामार्ग, 2360 कोटी रुपये तापी नदीतून जामफळ कनोली प्रकल्प व जलसिंचनासाठी मंजूर झाले. मुद्रा योजनेतून आठ लाख कोटी रुपये चार लाख बेरोजगारांना दिले. भारत कधीच गरीब नव्हता पण इंग्रजांपेक्षा स्वकीयांनी जास्त लुटला. आता मात्र लबाडी, लुट चालणार नाही. त्यामुळे देश लवकरच जगातील प्रगतीशील देशांच्या यादीत समाविष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव यांनी केले. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन हिरामण गवळी यांनी केले. तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात हजर होते.