चाळीस वर्षापासून बसस्थानकाची प्रतिक्षाच

एल. बी. चौधरी
रविवार, 30 जुलै 2017

सोनगीर हे 25 हजार लोकवस्तीचे असून मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीन व सोनगीर -अंकलेश्वर राज्यमार्ग क्रमांक 19 वर वसलेले आहे. परिसरात 30 ते 40 खेडी असून त्यांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. शिवाय शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ धुळ्याला ये - जा करतात. त्यामुळे येथील बसथांबावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बसथांबावर खासगी वाहने, कालीपिली, खाद्यपदार्थ विक्रेतेही गर्दी करतात.

सोनगीर (जि. धुळे) : येथे अद्ययावत बसस्थानक व्हावे अशी मागणी गेल्या चाळीस वर्षापासून आहे. मात्र प्रशासन व महामंडळाच्या दुर्लक्षामुळे व योग्य पाठपुरावा नसल्याने बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

सोनगीर हे 25 हजार लोकवस्तीचे असून मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीन व सोनगीर -अंकलेश्वर राज्यमार्ग क्रमांक 19 वर वसलेले आहे. परिसरात 30 ते 40 खेडी असून त्यांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. शिवाय शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ धुळ्याला ये - जा करतात. त्यामुळे येथील बसथांबावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बसथांबावर खासगी वाहने, कालीपिली, खाद्यपदार्थ विक्रेतेही गर्दी करतात. 

त्यामुळे अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. टपऱ्यांच्या अतिक्रमणात पिकअप शेड झाकले गेले असून त्याचा प्रवाशांसाठी काहीच उपयोग नाही अशी स्थिती झाली आहे.

येथे बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीने 35 वर्षापासून पोलिस ठाण्यासमोर पाच एकर जागा आरक्षित केली आहे. येथे महामार्गावर गावालगत धुळे व शिरपूर जाण्यासाठी वेगवेगळे दोन तसेच फाट्यावर नंदूरबार, धुळे व शिरपूर जाण्यासाठी वेगवेगळे तीन थांबे आहेत. त्यामुळे गैरसोय होते. सर्व बस एकाच ठिकाणी थांबतील असे अद्ययावत बसस्थानक व्हावे अशी मागणी आहे. गेल्या वर्षी धुळे आगाराचे विभाग नियंत्रक देवरे यांनी बसस्थानक बांधण्यासाठी वीस लाख रुपये मंजूरीचे आश्वासन दिले. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाला स्वत:चा इगो आडवा आला. त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन देत वेळकाढू धोरण अवलंबल्याने बसस्थानक झालेच नाही. ते व्हावे म्हणून आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, परिवहन मंडळाचे अध्यक्ष यांना हजारो निवेदन दिली. सर्व पक्षीय आंदोलन झाले. 1993 मध्ये संघर्ष समिती स्थापन झाली होती समितीने दहा हजार सह्यांचे निवेदन तत्कालीन अध्यक्ष पी.के.पाटील यांना दिले. बसस्थानक होतच नसल्याने गेल्या पाच- सहा वर्षापासून ग्रामस्थांनी प्रयत्नच सोडले. आता पुन्हा नव्याने सुरूवात होत असून सरपंच योगिता महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन देऊन पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र प्रशासनास जाग येत नसली तरी आमदार कुणाल पाटील यांनी बसस्थानक होईल असे आश्वासन दिले आहे. तसा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. ग्रामस्थांना आता बसस्थानकाची प्रतिक्षा आहे. त्यावरच गावाचा विकास अवलंबून आहे. 

दरम्यान सध्या बसथांब्याजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दीमुळे प्रवाशांना उभे राहायला जागा नाही. पावसाळ्यात पाणी साचून प्रवाशांना हाल भोगावे लागतात. पिण्याचे पाणी, शौचालय, महिलांसाठी योग्य स्वच्छतागृहांचा अभाव आहे.