धुळ्यात रणरागिणी मंडळ स्थापनेतून महिला शक्तीची उभारली गुढी! 

Dhule
Dhule

धुळे ः घर आणि शाळा, घर आणि गृहिणी, चूल आणि मूल, अशी महिला वर्गाविषयी परंपरागत असलेली विशेषणे "आम्ही साऱ्या जणी मिळून' यथाशक्ती बदलण्याचा प्रयत्न करू. अन्याय, अत्याचाराशी मुकाबला करू. शोषित, अबला नव्हे तर रणरागिणी होऊन सबला बनू. यासाठी आणखी आत्मविश्‍वास मिळावा म्हणून चंद्रशेखर आझादनगर परिसरातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रणरागिणी महिला मंडळाची स्थापना केल्याची माहिती संस्थापक तथा माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी दिली. 

जेल रोड परिसरातील "आयएमए'च्या सभागृहात "सकाळ- तनिष्का स्त्री प्रतिष्ठा' अभियान, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) महिलांची आत्मसुरक्षा आणि आरोग्य या विषयावर कार्यक्रम झाला. "आयएमए'च्या महिला विंगच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. मीनल वानखेडकर अध्यक्षस्थानी होत्या. अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, "आयएमए'च्या मिशन पिंक हेल्थ प्रकल्पाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. विजया माळी, माजी महापौर अहिरराव, विचारपुष्प पुस्तक भिशी संस्थेच्या डॉ. सुप्रिया पाटील, "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा प्रमुख पाहुणे होते. धुळ्यात पहिल्यांदाच एखाद्या प्रभागातून शंभर महिला, मुली, तरुणींचे मंडळ स्थापन झाल्याबद्दल मान्यवरांनी संबंधितांचा गौरव केला. 

रणरागिणी ग्रुपची स्थापना 
सौ. अहिरराव म्हणाल्या, की दोंडाईचात बालिका अत्याचार प्रकरण घडले. त्या बालिकेशी संवाद साधला. पाच वर्षाच्या बालिकेवर झालेला अन्याय, अत्याचार पाहून, छेडखानीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन स्वयं- आत्मनिर्भयतेसाठी रणरागिणी मंडळाची स्थापना करण्याची खूणगाठ बांधली. त्याची सुरवात आपल्या प्रभागातून आणि शंभर जणींच्या सहभागातून करण्याचे निश्‍चित केले. गुढीपाडव्याच्या दिवशी मंडळाची स्थापना केली. त्यात भारती अहिरराव, शोभा देसले, कीर्ती वराडे, पूजा कटके, नूतन पाटील, प्राजक्ता चौधरी, ज्योती चौधरी, रूपाली चौधरी, वैशाली चौधरी, पूजा परदेशी, हर्षदा पाटील, वर्षा पाटील आदींनी पुढाकार घेत सदस्य वाढविले. ग्रामसेविका, महिला कंडक्‍टर, शिक्षिका, मुख्याध्यापिका यासह तरुणी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या. मुलींना नाचगाणी पसंत असतात, त्यामुळे लोकपरंपरेतून म्हणजेच बारा पावली, लेझीम नृत्यातून रणरागिणी मंडळाच्या सदस्यांचे आकर्षण वाढविले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मंडळाच्या सदस्यांनी बारापावली, लेझीम नृत्यातून सर्वांचे लक्ष वेधले. मुलींचे पालक सुरक्षारक्षक बनले. यातून पालकांसह विद्यार्थिनी, तरुणींचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. 

विविध प्रशिक्षण देणार 
आत्मनिर्भरतेसाठी मंडळाच्या सदस्यांना वर्षभरात योगा, स्व-संरक्षणाची कला, कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी "आयएमए', "तनिष्का' अभियानाचे सहकार्य घेऊ. अशी मंडळे ठिकठिकाणी स्थापन झाल्यास महिलांसाठी निर्भयतेचे वातावरण निर्माण होऊ शकेल, असा विश्‍वास सौ. अहिरराव यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com