औद्योगिक वसाहतीत डिझेलचोरांची टोळी सक्रिय

औद्योगिक वसाहतीत डिझेलचोरांची टोळी सक्रिय

जळगाव - येथील औद्योगिक वसाहत परिसरात कंपन्यांबाहेर माल खाली करण्यासाठी व भरण्यासाठी रात्री उभ्या असलेल्या वाहनांमधील इंधन लांबविण्याच्या घटना दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. भारत पेट्रोलियम कंपनीबाहेर सिलिंडर भरण्यासाठी ट्रकच्या रांगा लागतात. पहाटे चालक व क्‍लीनर झोपेत असल्याचा गैरफायदा घेत चोरांच्या टोळ्या डिझेलवर डल्ला मारतात. आज पहाटे नऊ ते दहा वाहनांमधून डिझेलचोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सेक्‍टर "पी' आणि "सी'मधून बुधवारी (2 नोव्हेंबर) रात्री 2 ते गुरुवारी (3 नोव्हेंबर) पहाटे चारदरम्यान चोरट्यांनी नऊ ट्रकच्या टाक्‍यांमधून एक लाख दहा हजार रुपये किमतीचे एक हजार 760 लिटर डिझेल लंपास केले. गेल्या वर्षभरात औद्योगिक वसाहत परिसरातून अनेक ट्रकमधून डिझेलचोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, पोलिसांत एकही गुन्हा दाखल नाही. उलट संबंधित ट्रकचालकच डिझेल चोरत असल्याचे सांगून तक्रारदारांना औद्योगिक वसाहत पोलिस हुसकावून लावत असल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला.

इंधनटाक्‍या फोडून चोरी
औद्योगिक वसाहतीतील सेक्‍टर "पी'मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा रिफिलिंग प्लांट आहे. तेथे गुजरात, मध्य प्रदेश तसेच राज्यभरातून अनेक टॅंकर, ट्रक गॅस सिलिंडर रिफिलिंग करवून घेण्यासाठी येतात. बुधवारी (2 नोव्हेंबर) रात्री कंपनीच्या भिंतीला लागून अनेक ट्रक उभे होते. पैकी बी. एम. गोसावी यांच्या (एमएच-19-झेड-6341) ट्रकमधून 330, शीतलसिंग यांच्या (एमएच-19-झेड-3755) ट्रकमधून 200, एमएच-18-झेड-1555 या क्रमांकाच्या ट्रकमधून 250, आर. एन. चौधरी यांच्या (एमएच-18-बीए-2575) ट्रकमधून 150, बालाजी ट्रान्स्पोर्ट मुंबईच्या ट्रकमधून (एमएच-04-डीएस-6655 ) 200, तर एमएच-04-डीएस-9064 या ट्रकमधून 250 लिटर डिझेल चोरट्यांनी लंपास केले.

बीएसएनएल टॉवरजवळ 450 लिटरवर डल्ला
औद्योगिक वसाहतीतील बीएसएनएल टॉवरजवळील सेक्‍टर "सी'मधील लुंकड प्लास्टीक परिसरात असलेल्या चंचल शर्मा यांच्या मालकीच्या "रोहित रोडवेज' या ट्रान्स्पोर्टजवळ बुधवारी (2 नोव्हेंबर) रात्री तीन कंटेनर लावले होते. त्यातील कंटेनरमधून (एनएल-02-एन-8792) 200, एनएल-02-एन-8792 या क्रमांकाच्या ट्रकमधून 200, तर एनएल-02-क्‍यू-0628 या क्रमांकाच्या ट्रकमधून 60 लिटर डिझेल चोरट्यांनी लंपास केले. पैकी एका कंटेनरचा चालक मनिराम धर्मवीर यादव (रा. हरियाना) पहाटे दोनपर्यंत मोबाइलवर चित्रपट पाहत होता. त्यानंतरच चोरी झाल्याचे त्याने सांगितले. तसेच या ठिकाणी 25 ऑक्‍टोबरला रात्री कंटेनरमधून (आरजे-29-जीए-4968) 200 लिटर डिझेलचोरी झाली होती.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून प्रकार
औद्योगिक वसाहत परिसरात मोठ्या उद्योगाबाहेर माल भरण्यासाठी व ट्रक खाली करण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या रांगा आणि एकांतातील ट्रकमधून डिझेलचोरीचे प्रकार वर्षभरापासून सुरू असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यात दोन महिन्यांपूर्वी आर. एन. चौधरी यांच्या मालकीच्या ट्रकमधून 350 लिटर डिझेलचोरी झाली. सहा महिन्यांपूर्वी बी. एम. गोसावी यांच्या मालकीच्या ट्रकमधून (एमएच-19-झेड-892 ) 280 लिटर डिझेल चोरीस गेले. आठ महिन्यांपूर्वी फेब्रुवारीत एफसीआय गुदामाजवळ बाबा ट्रेड्रींगच्या ट्रकमधून हजारो लिटर डिझेल चोरट्यांनी लांबविले.

चालकावरच पोलिसांचे आरोप
डिझेलचोरी प्रकरणी ट्रकमालकाने पोलिसांत जाण्याची हिंमत केलीच, तर शेकडो प्रश्‍नांची सरबत्ती करीत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. तसेच तूच चोरी करून खोटी तक्रार देत असल्याचे बजावले जात असल्याने गरीब ट्रकचालक काढता पाय घेतो. परिणामी, तक्रारी दाखल होत नाहीत आणि चोरट्यांना फावते.

वीजमोटार लावून चोरी
डिझेलचोरीत निष्णात झालेल्या टोळ्या मध्यरात्रीनंतर ऑटोरिक्षा, मालवाहू छोट्या वाहनांत व टेम्पोमध्ये चार-पाच चोरटे पहाटे दोननंतरची वेळ डिझेलचोरीसाठी निवडतात. इंधनटाकीचे कुलूप तोडून नळीने बॅटरी चलीत वीजमोटारीने टाकीतील इंधन ओढून घेतात. डिझेलटाकीत नळी टाकून मोटारीद्वारे डिझेल त्यांच्या टेम्पोत असलेल्या टाकीत किंवा बाजूला छोटा ड्रम ठेवून डिझेलचोरी करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी उद्योजकांचे म्हणणे आहे. तसेच जर टाकीच्या झाकणाखाली जाळी असली, तर ट्रकच्या दोन टाक्‍यांमध्ये डिझेलची पातळीसारखी ठेवण्यासाठी पाइप लावलेले असतात. तसेच फ्युएल गेजचे मीटर असते. ते काढून चोरटे त्यात नळी टाकून डिझेल लांबवतात. काही मिनिटांतच दोनशे ते तीनशे लिटर इंधनाची इकडून तिकडे विल्हेवाट लावली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com