डिजिटल लाइफ समजविणारा डिजीधन मेळावा आज शहरात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नाशिक - कॅशलेसच्या दिशेने एक पाउल म्हणून निती आयोगाच्या सहकार्याने जिल्ह्यात डिजीधन मेळावा होणार आहे. उद्या (ता. 3) ठक्कर डोमच्या प्रांगणावर होणाऱ्या मेळाव्याला केंद्रीय मंत्र्यासह जिल्ह्यातील डिजिटल ग्राम साकारणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत आणि कॅशलेस कामकाजाच्या विविध टप्प्यांपासून तर तरुणांसाठी दोन तासांसाठी फूल टू धम्मालची अनुभूती देणाऱ्या फ्री वायफायपर्यंत सगळे काही एका छताखाली अनुभवयास मिळणार आहे. 

डिजीधन मेळाव्याचे उद्‌घाटन सकाळी दहाला केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे कॅशलेस व माहिती तंत्रज्ञानाशी निगडित विषयांवर प्रथमच होणाऱ्या मेळाव्यात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांसह वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या त्यांची उत्पादन मांडणार आहेत. साधारण 60 स्टॉल असतील. त्यात कॅशलेस कामकाजाच्या लहान लहान सुविधांपासून तर कॅशविरहित संपूर्ण कामकाजापर्यंतची माहिती असेल. दोन दिवसांपासून मेळाव्याची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी तयारीचा आढावा घेतला. 

वायफाय फ्री झोन 
मेळाव्यात दोन तास पूर्ण वायफाय फ्री सेवा असेल. त्यामुळे 500 एमबीपीएसपर्यंतच्या क्षमतेच्या या झोनमध्ये फ्री वायफायचा आनंद घेता येईल. मुलांसाठी स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यात कॅशलेस कामकाजात आघाडी घेतलेल्या गावातील बॅंक आणि सरपंचांसह स्थानिक प्रतिनिधींचा सत्कार केला जाईल. बॅंक ऑफ महाराष्ट्रातर्फे कॅशलेसबाबत सादरीकरण केले जाईल. भीम ऍप्लिकेशन, कॅशलेस गाव योजनांवर भर राहणार आहे. 

देशातील ग्राहकाची निवड 
डिजिटल व्यवहार करणाऱ्या देशातील ग्राहकांमधून सोडत काढून भाग्यवान ग्राहकाची निवड केली जाते. देशपातळीवरील या निवडीत 50 हजारांपर्यंतचे पारितोषिक जाहीर होते. राष्ट्रीय स्तरावरील लकी सोडत स्पर्धेत यापूर्वी नाशिकच्या ग्राहकाची निवड झाली आहे. उद्या दुपारी साडेतीनला देशातील भाग्यवान डिजिटल ग्राहक नाशिकला निवडला जाईल. 

लाभ घ्यावा  - राधाकृष्णन बी. (जिल्हाधिकारी)

कॅशलेस कामकाजाबाबत उपयुक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. 

Web Title: dijidhana rally today in the city