एरंडोल येथील कार्यक्रमात नेत्यांच्या कोपरखळ्या

Discussion between Gulabrao Patil Satish Patil A T Patil
Discussion between Gulabrao Patil Satish Patil A T Patil

एरंडोल : शिवसेनेचे उपनेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील व भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांनी एरंडोल येथील शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात एकमेकांना राजकीय कोपरखळ्या मारून पक्षप्रवेशाचे आवाहन केले. तिन्ही नेत्यांनी केलेल्या विनोदी व आक्रमक शैलीतील मनोगतांमुळे उपस्थित असलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली.

येथील शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे उद्घाटन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार होते. मात्र जलसंपदामंत्री महाजन यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे आयोजकांनी महाविद्यालयाचे उद्घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते व खासदार ए.टी.पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याचे जाहीर केले. मात्र कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष खासदार पाटील हेदेखील उशिरा आल्यामुळे ऐनवेळी आमदार डॉ.सतीष पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आले.

कार्यक्रमाच्या नियोजनात बदल झाल्यामुळे सर्व उपस्थित असलेल्या नेत्यांनी आपापल्या मनोगतात एकमेकांवर राजकीय कोपरखळ्या मारण्याची संधी सोडली नाही. यावेळी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे पाहून राजकीय टोमणे मारले. यापूर्वी गुलाबराव पाटील तुमच्या बोलण्यात आक्रमकपणा दिसत होता त्यामुळे कामे लवकर होत होती. मात्र, तुमचा पूर्वीचा आक्रमकपणा कमी झाल्यामुळे कामे होत नाहीत, असा खोचक टोला आमदार डॉ. पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला.

तसेच खासदार ए.टी.पाटील देखील कार्यक्रमास नेहमी उशिरा येत असल्यामुळे काही वेळ का असेना मला कार्यक्रमाचे अध्यक्षपद मिळाले असे सांगून केंद्र व राज्य सरकारच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच भाजपऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेने जवळीक करावी असा उपरोधिक सल्ला त्यांनी मंत्री पाटील यांना दिला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच विवाह पत्रिकांमध्ये आता भावी आमदार असा उल्लेख केला जात असल्याबद्दल त्यांनी खिल्ली उडवली. गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांना आपण शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमास आलो आहोत. त्यामुळे याठिकाणी राजकीय शेरेबाजी करू नका, असे सांगितले. खासदार ए.टी.पाटील यांनी आमदार डॉ.सतीश पाटील यांना उद्देशून तुम्हीच भाजपमध्ये या असे जाहीर आवाहन केले.

यावेळी खासदार पाटील हे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत असताना देखील त्यांना राजकीय कोपरखळी मारण्याची संधी डॉ. पाटील व गुलाबराव पाटील यांनी सोडली नाही.यावेळी डॉ. पाटील यांनी किशोर काळकर यांना उद्देशून भाजपमध्ये लोकप्रतिनिधींपेक्षा संघटन मंत्र्याला विशेष महत्वाचे स्थान असून असे भारदस्त व्यक्तिमत्व कार्यक्रमास उपस्थित असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असल्यामुळे हा कार्यक्रम सर्वपक्षीय असल्याचे सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com