लोकसंख्येनुसार गावनिहाय टँकरच्या फेऱ्या मंजूरीचे अधिकार तहसीलदारांना!

District Collector has ordered to supply water to 14 villages of the taluka through 5 government trunkers
District Collector has ordered to supply water to 14 villages of the taluka through 5 government trunkers

येवला - 28 मार्चपासून परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील 14 टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच लोकसंख्येनुसार टंचाईग्रस्त गावांना फेऱ्या मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना असल्याचे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

यावर्षी सुरवातीपासूनच टँकर मंजुरीला दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सुरवातीला तर तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर टँकर मंजूर केले होते. आताही मागणीनंतर पंधरा दिवसांनी टँकर मंजुरीला मुहुर्त मिळाला आहे. यासंदर्भात सकाळने नेहमीच आग्रही भूमिका मांडून लक्ष वेधले होते.

अखेर जिल्हाधिकार्‍यांनी 13 एप्रिल रोजी तालुक्यातील 14 गावांना 5 शासकीय ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. जानेवारी महिन्यापासूनच येथील पंचायत समिती कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांनी ग्रामपंचायती मार्फत ट्रँकर सुरु करण्याच्या मागणीचे प्रस्ताव दाखल करायला सुरुवात केली होती. टंचाईग्रस्त गावांची तहान बघून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, सभापती आशा साळवे, शिवसेनेचे तत्कालीन तालुका प्रमुख झुंजार देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सविता पवार, सुरेखा दराडे, कमलबाई आहेर आदींसह लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांना वेगवेगळ्या शिष्टमंडळद्वारे भेटून पाणी ट्रँकर सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आडमुठेपणाची भुमिका घेत जानेवारी महिन्यापासून टंचाईग्रस्त गावांना पाणी ट्रँकर सुरु करण्यास मंजुरी दिली नव्हती. यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात होत्या. या गावांमधील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मागील आठवड्यात दिला होता.

तालुक्याच्या उत्तर- पूर्व भागातील गावांना डिसेंबर अखेरच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील गावांना पाण्याच्या आवर्तनामुळे विहिरींना आजही पाण्याचे स्त्रोत सुरु आहेत. त्यामुळे कालवा लाभक्षेत्रातील गावे पिण्याच्या पाण्यासाठी सद्यातरी तृषार्त असून कालवा लाभक्षेत्रातील गावे सोडून तालुक्याच्या उत्तर- पूर्व भागातील गावांमधील विहिरींनी डिसेंबर महिन्यातच तळ गाठलेला आहे. प्रस्तावाला मंजुरी देण्यास टाळाटाळ होत असल्याने आमदार जयंत जाधव यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली होती. अखेर पाणीबानी करणाऱ्या ग्रामस्थांना एप्रिल महिन्याच्या मध्यावर दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील गारखेडे, सोमठाणजोश, महादेववाडी (सायगाव), रामवाडी (सायगाव), कौटखेडे, वसंतनगर, गोरखनगर, पांजरवाडी, शिवाजीनगर, रेंडाळे, आडसुरेगाव, भुलेगाव, अनकाई व राजापूर या चौदा गावे, वाड्यांना पाच शासकीय ट्रँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काल 13 एप्रिल ला दिले आहेत.

आता 28 गावे व वाड्यांना 11 शासकीय ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. वसंतनगर, जायदरे, ममदापूर तांडावस्ती, निळखेडे, हाडपसावरगाव, देवठाण, तांदुळवाडी या गावांचे पिण्याच्या पाण्यासाठीच्या ट्रँकरांना जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिलेली नसून या गावांचे पाणी ट्रँकरचे प्रस्ताव 28 मार्च ला जिल्हाधिकार्‍यांकडे प्रांत कार्यालयाकडून दाखल झालेले होते. तालुक्यातील धनकवाडी आणि गणेशपूर येथील ट्रँकर सुरु करण्याचे प्रस्ताव तहसिल कार्यालयामार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहेत. तर वाघाळे, देवदरी, खरवंडी, नायगव्हाण, नगरसूल वाड्या-वस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाडे ग्रामपंचायतींमार्फत दाखल करण्यात आलेले आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस कडक उन्हाळ्याच्या तडाख्यात वाढु लागली असून प्रशासनाने तहानलेल्या गावांना पाणी ट्रँकर त्वरीत सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com