जिल्हा रुग्णालय मद्यपी डॉक्‍टरमुळे वेठीस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नाशिक - जिल्हा रुग्णालयाची गर्भपात प्रकरणामुळे नाचक्की झालेली असताना आता कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारीच मद्याच्या नशेत तर्रर असल्याचा प्रकार काल (ता. 20) घडला. रुग्णावर उपचार करण्यास थेट नकार देत नातलगांशीही अरेरावी करणाऱ्या डॉ. दिनेश पवार यांना जिल्हा रुग्णालयातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. 

नाशिक - जिल्हा रुग्णालयाची गर्भपात प्रकरणामुळे नाचक्की झालेली असताना आता कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारीच मद्याच्या नशेत तर्रर असल्याचा प्रकार काल (ता. 20) घडला. रुग्णावर उपचार करण्यास थेट नकार देत नातलगांशीही अरेरावी करणाऱ्या डॉ. दिनेश पवार यांना जिल्हा रुग्णालयातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. 

जिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. 20) रात्री अकराला इगतपुरी-खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरदास लोहकरे यांचे वडील नरहरी लोहकरे यांना उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयात बराच वेळ रात्रपाळीचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. काही वेळाने डॉ. दिनेश पवार आले; परंतु ते मद्याच्या नशेत तर्रर होते. त्यांना रुग्णाला तपासण्याचीही शुद्ध नव्हती. ही बाब रुग्णाच्या नातलगांच्या लक्षात येताच त्यांनी जाब विचारला. डॉ. पवार यांनी अरेरावी करून उपचाराला टाळाटाळ करत निघून जाण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉ. पवार यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रुग्ण लोहकरे यांच्यावर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. मात्र, तोपर्यंत डॉ. पवार जिल्हा रुग्णालयातून गायब झाले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाकडून डॉ. पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. मात्र, त्यांची वैद्यकीय तपासणी न केल्याने आता ते मद्यपान केले नसल्याचीच भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. 

रात्रपाळीला मद्याच्या नशेतच 
डॉ. दिनेश पवार जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर म्हणून कार्यरत आहेत. ते रात्रपाळीला ड्यूटीवर असताना नेहमी मद्याच्या नशेत तर्रर असतात. त्यामुळे अनेकदा रुग्णालयातील परिचारिकाही त्यांच्यापासून दोन हात लांब असतात. शनिवारी कर्मचाऱ्यांनीच त्यांचा बचाव केल्याने त्यांची त्याच वेळी वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. 

डॉ. दिनेश पवार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मद्याच्या नशेत उपचार करताना रुग्णाच्या जिवाशी त्यांना खेळण्याचा कोणी अधिकार दिला? अशा डॉक्‍टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल. 
- हरदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य