धुळ्यातील डॉक्‍टर मारहाणीचा निषेध ‘आयएमए’तर्फे जिल्हाभरात ‘बंद’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

बाराशे डॉक्‍टरांचा सहभाग; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जळगाव - धुळे येथे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. म्हामुनकर यांना मंगळवारी (१४ मार्च) जमावाकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यात त्यांच्या मेंदू व डोळ्याला मार लागला. या प्रकाराच्या निषेधार्थ ‘आयएमए’ महाराष्ट्रतर्फे आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. दुपारपर्यंत पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील हजार ते बाराशे डॉक्‍टरांनी सहभागी होऊन त्यास पाठिंबा दर्शविला.

धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रोहन म्हामुनकर यांना रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरून रुग्णाच्या नातेवाइकांनी अपघात कक्षात शिरून अमानुषपणे मारहाण केली. त्यात डॉ. म्हामुनकर यांच्या मेंदू व डोळ्याला मार लागला. या प्रकाराचा सर्वत्र निषेध केला जात असून, ‘आयएमए’तर्फे संपूर्ण राज्यात आज बंद पुकारण्यात आला. बंदला जिल्ह्यात प्रतिसाद लाभला असून, हजार ते बाराशे डॉक्‍टरांनी रुग्णालये बंद ठेवली. ‘आयएमए’च्या बंदला डेंटल असोसिएशननेही पाठिंबा दर्शविला.

दुपारपर्यंत रुग्णालये बंद
धुळ्यातील डॉ. म्हामुनकरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘आयएमए’ने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व रुग्णालये पूर्णपणे बंद होती. ‘आयएमए’तर्फे दुपारी एकपर्यंत बंद पाळण्यात आला. या काळात सर्व खासगी रुग्णालयांतील रुग्ण तपासणी बंद होती. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना सकाळी परत फिरावे लागले. दुपारी एकनंतर बंद मिटल्यावर मात्र रुग्णालयांत रुग्ण तपासणी सुरू झाल्याने रुग्णांचे फारसे हाल झाले नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘आयएमए’तर्फे सदर घटनेचा निषेध करून मागण्यांबाबत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने डॉक्‍टरांवरील होणारे हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा ठेवणे, हल्लेखोरांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे. तसेच शासकीय रुग्णालयांत रुग्णाच्या केवळ दोनच नातेवाइकांना प्रवेश द्यावा, या मागण्या केल्या आहेत.