गावात दारू पिऊन येण्यालाच बंदी हवी...! 

गावात दारू पिऊन येण्यालाच बंदी हवी...! 

कापडणे - धुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये दारूबंदीच्या दिशेने दमदार पावले उचलली जात आहेत. धनूर व निकुंभे (ता. धुळे) या दोन गावांत पूर्णतः दारूबंदी झाली. पण ही बंदी केवळ फार्स ठरत असून, पिणाऱ्यांसाठी शेजारची गावे नंदनवन ठरत आहेत. या शेजारील मोठ्या गावांमध्ये परवानाधारक दारू दुकाने असल्याने तेथे जाऊन दारू पिऊन येणाऱ्यांना कसे रोखणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यामुळे गावात दारू पिऊन येणाऱ्यांनाच बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. 

गावात दारूबंदी करण्याऐवजी "दारू पिण्यास बंदी' असा ठराव ग्रामसभेने करणे आवश्‍यक आहे. महिलांनी घरापासूनच सक्षम होऊन आंदोलन करण्यास प्रारंभ केल्यास, खऱ्या अर्थाने दारूबंदीचा फायदा होणार आहे. दारूबंदी असलेल्या गावांमध्ये बंदीचा आनंद असला तरी "त्या' गृहिणी मात्र नाराजच आहेत. काही गावांमध्ये दारूबंदीच्या दिशेने दमदार पावले उचलली जात आहेत. यात विशिष्ट व्यक्तींचा अडसर मोडीत काढीत दारूबंदीचे समाधान त्यांना मिळत आहे. पण व्यसनाधीनांचे पिणे कमी झाले का, हे पाहणे संशोधनाचा विषय झाला आहे. 

अन्य गावांत सहज सोय 
दारूबंदी असलेल्या गावांमधील मद्यपी शेजारील एक- दोन किलोमीटरवरील गावांमधून सहज दारूची सोय करून घेत आहेत. पोटलीतूनही विक्री वाढली आहे. शेतीशिवारातही दारू पाडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एका गावात दारूबंदी झाल्याने फारसा परिणाम जाणवत नसल्याने शेजारील गावांत दारूबंदी झाली तरच उद्देश सफल होणार आहे. 

दारू पिण्यास बंदी केव्हा? 
आंध्र प्रदेशानंतर आता गुजरातमध्ये दारूबंदी आहे. तिथे कशा पद्धतीने दारूबंदी आहे, हे तिथे स्थायिक झालेले खानदेशातील नागरिक सांगतात. बंदी केल्यानंतर पर्यायी मार्ग बरेच आहेत. ग्रामसभेत दारूबंदीबरोबर दारू पिण्यासही बंदीचा निर्णय झाला पाहिजे, तरच हेतू साध्य होणार आहे. 

गृहिणी सर्वत्र नाराजच 
सर्वसामान्यांसह मोलमजुरी करणाऱ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढतेच आहे. याचा सर्वाधिक मनस्ताप गृहिणींना सहन करावा लागत आहे. हालअपेष्टा सहन करीत कुटुंबाचा गाडा त्या हाकत आहेत. दारूबंदी करूनही उपयोग होत नसल्याचे गृहिणींनी सांगितले. गावात दारूबंदी करून उपयोग नाही, पिणारे कुठूनही पितात, म्हणून गावात दारू पिऊन येणाऱ्यांनाच बंदी असावी, अशी महिलांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com