प्रवासी तिकीट देण्याची जबाबदारी चालकावर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

‘एसटी’च्या जळगाव विभागात १०२ ‘चालक कम वाहकां’ची भरती

जळगाव - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना चला, तिकीट, तिकीट असे म्हणत गर्दीतून वाट काढत जाणारा आणि थांबा आला, की बेल वाजवून बस थांबविणाऱ्या वाहकाची भूमिका बदलणार आहे. दळणवळणाची वाहिनी असणाऱ्या या बसमध्ये आता प्रवाशांना तिकीट देण्याची जबाबदारी चालकांवर येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही जबाबदारी सांभाळण्याचे काम राज्यभरात सुरूही झाले आहे. 

‘एसटी’च्या जळगाव विभागात १०२ ‘चालक कम वाहकां’ची भरती

जळगाव - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना चला, तिकीट, तिकीट असे म्हणत गर्दीतून वाट काढत जाणारा आणि थांबा आला, की बेल वाजवून बस थांबविणाऱ्या वाहकाची भूमिका बदलणार आहे. दळणवळणाची वाहिनी असणाऱ्या या बसमध्ये आता प्रवाशांना तिकीट देण्याची जबाबदारी चालकांवर येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही जबाबदारी सांभाळण्याचे काम राज्यभरात सुरूही झाले आहे. 

‘एसटी’चे चाक तोट्याच्या गाळात रुतल्याचे म्हटले जाते. परंतु ‘एसटी’ला उत्पन्न मिळवून देण्याचे काम चालक-वाहकच खऱ्या अर्थाने करत असतात. अर्थात महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारावर एकूण उत्पन्नाच्या ४० ते ४५ टक्के रक्कम खर्च होत असतो. यामुळे मनुष्यबळ कमी करण्याच्या कल्पनेतून ‘चालक कम वाहक’ ही संकल्पना पुढे आणत त्यानुसार भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यापुढे वाहकाचे काम चालकाला करावे लागणार आहे. 

विभागात १०२ कर्मचारी
कर्नाटकच्या धर्तीवर दोन्ही कामे एकाच व्यक्‍तीकडून करून घेण्यासाठी ‘चालक कम वाहकां’ची भरती करण्याचा विचार महामंडळाने करत तशी प्रक्रियाही सुरू केली आहे. तसेच विनावाहक बसफेऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ‘चालक कम वाहक’ ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार गेल्या वर्षी झालेल्या भरती प्रक्रियेत जळगाव विभागात १०२ चालक कम वाहक यानुसार भरती करण्यात आले आहेत. मुळात जळगाव विभागात सद्यःस्थितीत १२२ वाहक कमी आहेत. ‘चालक कम वाहक’पदामुळे ही समस्या मिळणार असून, या कर्मचाऱ्यांना प्राथमिक स्वरूपात सराव म्हणून विभागात सुरू असलेल्या विनावाहक बसफेऱ्यांवर ड्यूटी लावण्यात येत आहे. म्हणजेच अशा कर्मचाऱ्याला आठ तासांच्या ड्यूटीत सहा तास चालक आणि दोन तास वाहक म्हणून काम करावे लागणार आहे.

विनावाहक नवीन बसफेऱ्या
जळगाव विभागाकडून पहिली विनावाहक बसफेरी जळगाव- धुळे या मार्गावर सुरू केली. या मार्गावर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे दोन महिन्यांपूर्वी जळगाव-औरंगाबाद मार्गावर विनावाहक बसफेरी सुरू केली आहे. आता याच धर्तीवर विभागातून अमळनेर- धुळे- जळगाव ही नवीन विनावाहक बसफेरी सुरू करण्यात येणार आहे. तसेच तालुका- तालुका जोडण्याच्या दृष्टीने चाळीसगाव- चोपडा आणि चाळीसगाव- यावल (विदगावमार्गे) या विनावाहक नवीन फेऱ्या येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत.

‘चालक कम वाहक’ अशी नवीन भरती करण्यात येत असून, यामुळे निश्‍चितच फायदा होणार आहे. विभागात वाहकांची संख्या कमी असल्याने या भरतीमुळे ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
- चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, जळगाव

Web Title: driver responsibility to provide passenger ticket