चाळीसगाव - तमगव्हाणकरांसाठी थेंब अन्‌ थेंब महत्त्वाचा 

 दीपक कच्छवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यःस्थितीत सहाव्या दिवशी आणि तेही जेमतेम दहा निमिटे पाणी मिळत आहे. येत्या काही दिवसांत गावात पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीप्रश्‍नावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

मेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यःस्थितीत सहाव्या दिवशी आणि तेही जेमतेम दहा निमिटे पाणी मिळत आहे. येत्या काही दिवसांत गावात पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीप्रश्‍नावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

चाळीसगावपासून वीस किलोमीटरावरील तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथे सध्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीतर्फे पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हा पुरवठा केवळ दहाच मिनिटे असतो. ज्यामुळे ग्रामस्थांना पाच दिवस पुरेल एवढे पाणी साठवताच येत नाही. या पाण्यात दोन- चार हंडेच भरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी विहीर मन्याड धरणाच्या खडक्‍या नाल्यावर आहे. या नाल्याला पाणीच नसल्याने विहिरीतही पाणी नाही. परिणामी, ग्रामस्थांना आजूबाजूच्या शेतातील विहिरींचे पाणी आणून प्यावे लागत आहे. काही ग्रामस्थांना तर अक्षरशः तीन किलोमीटरावरील पिंपळवाड निकुंभ गावात जाऊन सायकल किंवा मोटारसायकलने पाणी आणावे लागत आहे. सद्यःस्थितीत प्रशासनाने किमान टॅंकरने तरी पाणीपुरवठा करावा आणि महिलांसह ग्रामस्थांची भटकंती थांबवावी, अशी मागणी होत आहे. 

पाण्यावाचून गुरांचे हाल 
या भागात गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामस्थांनाच पुरेसे पाणी नाही, तर गुरांचे काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. यासाठी पशुपालकांना कसरत करावी लागत आहे. काहींनी तर आपली गुरे अक्षरशः विक्रीला काढली आहेत. गावाबाहेरील खडक्‍या नाल्याजवळील विहिरीला पाणी असल्याने बहुतांश पशुपालक गाई, म्हशी, शेळ्या तेथे नेतात. पण या विहिरीचे पाणीही आठ- दहा दिवस टिकेल एवढेच आहे. 

हातपंपाला पिवळसर पाणी 
गावात दोन हातपंप असून, त्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन्ही पंपांमधून पाणी पिवळसर येते. यातील एक हातपंप अक्षरशः नाल्याजवळ आहे. या नाल्याच्या दुर्गंधीमुळे हे पाणी देखील वापरायोग्य नाही. जवळपास कुठेही पाणी नसल्याने ग्रामस्थांना किमान वापरण्यासाठी या हातपंपाचे पाणी वापरावे लागत आहे. यामुळे दोन्ही हातपंपांच्या पाण्याची तपासणी करावी, अशीही मागणी होत आहे. 

काही ठिकाणचे विहीरमालक त्यांच्या विहिरीवरून पाणी भरू देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागते. गावात किमान तिसऱ्या दिवशी तरी अर्धा तास पाणी मिळाले पाहिजे. जेणेकरून पाण्यासाठी होणारी पायपीट तरी थांबेल, असे संगीताबाई भिल यांनी सांगितले.  

या भागात सुमारे दोन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. दिवस उजाडला म्हणजे डोक्‍यात फक्त पाण्याचाच विचार असतो. पाण्यामुळे कुठलेच काम सुचत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी लताबाई पाटील यांनी केली. 

पाच दिवसांआड पाणी सोडल्यानंतर त्यात दोन- तीनच हंडे भरतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रणरणत्या उन्हातही भटकंती करावी लागते. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने पाण्याचे टॅंकर तरी सुरू करावे, असे तुळसाबाई सोनवणे सांगितले. 

हातगाव धरण क्रमांक एकच्या खालून तातडीची जलवाहिनी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला आहे. तमगव्हाणचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील. 
- आर. सी. पाटील, सहाय्यक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, चाळीसगाव

Web Title: drop of water is important for tamgavhankar