सदोष बियाण्यामुळे दोन लाख रुपयांच्या कांद्याचे नुकसान

onion
onion

सटाणा : पारनेर (ता.बागलाण) येथील शेतकरी जालिंदर देवरे यांच्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला सदोष बियाण्यामुळे टोंगळ आले आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबधित बियाणे कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकरी देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात कांदा उत्पादक शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथे उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आणि लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत, १५ सप्टेंबर २०१७ रोजी सटाणा येथील मे. यशवंत जी मोरे यांच्याकडून इंडो-अमेरिका (हा) सिड्स या कंपनीचे मार्शल कांदा बियाणे वाण खरेदी केले होते. त्यावेळी पाचशे ग्राम वजनाचे सात पाकिटे विकत घेतली होती. त्याची रोपं तयार करून ८ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या दीड एकर क्षेत्रावरील शेतात कांद्याची लागवड केली होती. सुमारे साठ हजार रुपयांचे कांदा पिक उभे केले, मात्र त्याला सदोष बियाण्यामुळे अक्षरशः टोंगळ फुटले. त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

देवरे यांच्या तक्रारीची दखल घेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस, बियाणे महामंडळाचे डॉ.जे.के.ढेभरे, कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधींनी पिकाची पाहणी करून ८० टक्के कांदा पिकाचे नुकसान झाल्याची कबुली दिल्याचा दावा पिडीत शेतकरी श्री.देवरे यांनी केला आहे. मात्र कंपनीने फक्त बियाण्याचा खर्च देऊ असे सांगून एकप्रकारे हात वर केल्याचे तक्रारीत देवरे यांनी नमूद केले आहे.

सदोष बियाणे विक्री करून कंपनीने एकप्रकारे माझी फसवणूक केली असून यामुळे माझे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आज कांद्याला असलेला भाव बघता बियाण्यांमुळे नुकसान झाल्याने मानसिक त्रास वाढला आहे. कृषी विभागाने त्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जालिंदर देवरे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com