वैचारिक गोंधळामुळे डिजिटल युगात युवापिढीसमोर संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक - स्वातंत्र्यानंतरही भारतीय विचारांवर डाव्यांचा पगडा राहिला. आता त्यांचे आसन डळमळीत होऊ लागल्यापासून ते नैराश्‍येपोटी टीका करीत आहेत. त्यांच्या वैचारिक गोंधळामुळेच डिजिटल युगातही युवा पिढी संभ्रमावस्थेत वावरत आहे. या नव्या युवा पिढीला दिशा सापडत नाही, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी आज केले. 

नाशिक - स्वातंत्र्यानंतरही भारतीय विचारांवर डाव्यांचा पगडा राहिला. आता त्यांचे आसन डळमळीत होऊ लागल्यापासून ते नैराश्‍येपोटी टीका करीत आहेत. त्यांच्या वैचारिक गोंधळामुळेच डिजिटल युगातही युवा पिढी संभ्रमावस्थेत वावरत आहे. या नव्या युवा पिढीला दिशा सापडत नाही, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी आज केले. 

शंकराचार्य न्यासाच्या संदर्भ ग्रंथालयातर्फे आज श्री. केतकर यांचे "भारतीय विचार आणि विकास दृष्टी' यावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर दोनच पर्याय होते. विकासासाठी भारतीयांनी ब्रिटिश राजवट स्वीकारली होती. भारतीय विचारसरणीवर आधारित समाज केंद्रित राज्यव्यवस्थाच आज गरजेची आहे. ब्रिटिशकालीन दृष्टिकोनातून विकासाची मोजपट्टी आता बंद करावी लागेल, असे वाटते. आज युवा पिढीवर विचारवंतांचा प्रभाव असूनही त्यांच्या प्रश्‍नांना उत्तर मिळत नाही. ते डिजिटल जगताचा आधार घेऊन उत्तरे शोधत आहेत. डाव्या विचारसरणीचा सर्वाधिक पगडा राहिल्याने माध्यमातूनही त्याचे प्रतिबिंब उमटत राहिले. त्याला विरोध करणाऱ्या स्वतंत्र दृष्टीच्या विचारसणीला प्रस्थापित होऊच दिले नाही. आज दोघांमध्ये वैचारिक स्तरावर द्वंद्व सुरू आहे, असे ते म्हणाले. आशिष कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दिलीप क्षीरसागर यांनी आभार मानले. 

प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांचे महत्त्व अधिक 
व्याख्यानापूर्वी श्री. केतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की देशातील तीन टक्‍के इंग्रजी माध्यमाचा 97 टक्‍के प्रादेशिक भाषेतील माध्यमांवर पगडा आहे. ते ठरवतील तीच बातमी शीर्षक होते. मात्र, त्या तीन टक्के इंग्रजी वृत्तपत्रांचा समाजातील तळागाळातील जनतेशी काही संबंध नसतो. सर्वाधिक विश्‍वासार्हता प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांना आजही आहे. प्रादेशिक वृत्तपत्रांनी स्वतःच्या स्वतंत्र विचारसरणीचे प्रतिबिंब आपल्या वर्तमानपत्रांतून उमटविले पाहिजे. कायम नकारात्मक बातम्यांपेक्षा सकारात्मक बातम्यांची कास धरली पाहिजे, असेही ते म्हणाले.