जावेद मियॉंची महासभेत जीभ घसरली

malegaon-municipal
malegaon-municipal

मालेगाव - महापालिकेच्या वाडिया व अली अकबर रुग्णालयातील सुविधांचा अभाव, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता व मालेगाव एज्युकेशन संस्थेच्या बांधकामावर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून आजच्या महासभेत जोरदार गोंधळ झाला. या वादाला पूर्व-पश्‍चिम असे स्वरूप येत असून, वाद आटोक्‍यात येत नसल्याने महासभा तीन दिवस तहकूब करण्याचा निर्णय महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांनी जाहीर केला. तहकुबीमुळे शहर विकासाचे महत्त्वपूर्ण विषय लांबणीवर पडले आहेत. आजचा गोंधळ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्याची लक्षणे होती.

आज दुपारी चारला महासभेला सुरवात झाली. जावेद शेख सभागृहात चादर, उशी घेऊन आले. सभेला सुरवात होताच श्री. शेख यांनी रुग्णालयातील सुविधांचा अभावाचा मुद्दा उपस्थित केला. पाठोपाठ महापौरांनी महासभेत दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे मालेगाव एज्युकेशन संस्थेच्या बांधकामावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत सभागृहाच्या हौदात व नंतर थेट टेबलावर पथारी पसरून मागणी लावून धरली. आयुक्त रवींद्र जगताप यांनी याबाबत 260 ची नोटीस दिली आहे. सुनावणी होऊ द्या. सध्या काम बंद आहे. नगरसचिवांचा अहवाल माझ्याकडे येणार आहे. त्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रिया पार पडताच कारवाई करू, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख व सहकारी सदस्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. गोंधळातच शेख यांचा तोल सुटला. "स्कूल की जगह उनके बाप की है क्‍या?' असा शब्दप्रयोग त्यांनी केला. यानंतर पश्‍चिम भागातील नगरसेवकही आक्रमक झाले. संजय दुसाने, मदन गायकवाड, तानाजी देशमुख, बाळासाहेब आहिरे आदींसह सर्व नगरसेवक महापौरांच्या टेबलाकडे धावून गेले. कायदेशीर कारवाई करा. मात्र एका नगरसेवकाच्या हट्टासाठी सभागृह व शहराला वेठीस धरू नका, असे सांगितले. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. महापौर हतबल झाले होते. त्यातून वाद वाढण्याची लक्षणे दिसू लागताच महापौरांनी सभा तीन दिवसांसाठी तहकूब केली.

महासभा तहकुबीनंतरही श्री. शेख सभागृहात पथारीवर ठाण मांडून बसले. यादरम्यान आयुक्तांच्या दालनात महापौर हाजी मोहंमद इब्राहिम, मलिक युनूस ईसा, नरेंद्र सोनवणे, एजाज उमर, मोहंमद सुलतान व नगरसेवकांनी चर्चा केली. आयुक्तांनी याबाबत सुरू असलेल्या कारवाईची माहिती त्यांना दिली. त्यानंतर सभागृहात जाऊन आयुक्त, महापौरांनी श्री. शेख यांची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्‍वासन दिले. यानंतर शेख यांनी त्यांचा ठिय्या मागे घेतला.

शाळेच्या बांधकामप्रश्‍नी प्रशासन योग्य ती कारवाई करेल. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. एक नगरसेवक दांडगाई करून प्रशासनाला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात हिंदू अल्पसंख्याक आहेत. त्यांची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न कदापि सहन करणार नाही. याप्रश्‍नी जशास तसे उत्तर देऊ. बहुमताच्या जोरावर दादागिरी खपवून घेणार नाही.
-संजय दुसाने, शिवसेना नगरसेवक

या बांधकामाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्तांना फोन केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. जावेद शेख अपुऱ्या माहितीवर आधारित बोलले, ते गैर आहे. या प्रकरणात पालकमंत्र्यांचा कुठलाही संबंध नाही. नाहक पराचा कावळा केला जात आहे. याबाबत जाणूनबुजून शाळेला टार्गेट केल्यास ते सहन केले जाणार नाही. प्रशासन योग्य ती कारवाई करेल.
-मदन गायकवाड, भाजप नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com