समांतर रस्त्यांसाठी आठ किलोमीटरची पदयात्रा

समांतर रस्त्यांसाठी आठ किलोमीटरची पदयात्रा

जळगाव - येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न व त्यामुळे वाढलेले अपघात, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीने गांधीजींच्या मार्गावर चालत ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून गांधीमार्च- पदयात्रा काढण्यात आली. शहरातील अजिंठा चौक ते खोटेनगर या दहा किलोमीटरच्या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून समांतर रस्त्यांच्या प्रश्‍नासंदर्भातील संवेदना दाखविली.

‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून आज समांतर रस्त्यांसाठी गांधीमार्च- पदयात्रा काढण्यात आली. गांधीमार्च- पदयात्रेला जळगावकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. अजिंठा चौफुलीवरून पदयात्रेला सकाळी साडेनऊला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली. यावेळी महात्मा गांधी व अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, महापौर नितीन लढ्ढा, डॉ. उल्हास पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, युवाशक्‍तीचे विराज कावडिया, डॉ. राधेश्‍याम चौधरी, फारुक शेख यांनी समांतर रस्त्यांबाबत मत मांडले. यानंतर पदयात्रेस सुरवात झाली. पदयात्रेत आमदार सुरेश भोळे, माजी महापौर रमेश जैन, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील, विष्णू भंगाळे, रवींद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, अमर जैन, पृथ्वीराज सोनवणे, अश्‍विनी देशमुख, भारती सोनवणे, अमित जगताप, सौरभ चतुर्वेदी, मंजित जांगीड, मीतेश गुजर, नवल गोपाल, त्रिमूर्ती कॉलेजचे मनोज पाटील आदी सहभागी पदयात्रेत सहभागी झाले होते.

आठ किलोमीटरची पदयात्रा
शेकडो नागरिकांच्या सहभागाने निघालेली पदयात्रा अजिंठा चौफुलीवरून इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, डॉ. अग्रवाल हॉस्पिटल, शिवकॉलनी, दादावाडी, खोटेनगरापर्यंत नेण्यात आली. महामार्गावरील आठ किलोमीटर अंतर चालत जाऊन समांतर रस्त्यांचा प्रश्‍न प्रशासनासमोर मांडून खोटेनगर बसथांब्यानजीक पदयात्रेचा समारोप झाला. 

या संस्थांचा होता सहभाग
पदयात्रेत दर्जी फाउंडेशन, त्रिमूर्ती कॉलेज, जिल्हा पत्रकार संघ, युवाशक्‍ती फाउंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम, इंदिराई फाउंडेशन, जिल्हा महिला असोसिएशन, मणियार बिरादरी, जनरल प्रॅक्‍टिस असो., सावरकर रिक्षा युनियन, महात्मा फुले मानव विकास प्रतिष्ठान, माऊली फाउंडेशन, मोरया फाउंडेशन, माय माऊली फाउंडेशन, राम समर्थ मंडळ, आर्य चाणक्‍य फाउंडेशन, इम्पिरियल इंग्लिश स्कूल, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशन, नेचर क्‍लब, जवान फाउंडेशन, सृष्टी फाउंडेशन, ब्लॅक आउट ग्रुप, युवाक्रांती प्रतिष्ठान, इंडियन मेडिकल असो., जिल्हा स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, तळवलकर जीम, उमवि कर्मचारी संघटना आदी संस्थांचा सहभाग होता.
 

आकाशवाणी चौकात किरकोळ अपघात
महामार्गावरून पदयात्रा जात असताना ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहने थांबविली जात होती. परंतु आकाशवाणी चौकातून पदयात्रा जात असताना वाहतुकीत अडकू नये याकरिता काव्यरत्नावली चौकाकडून येणारा डंपर काढण्याचा प्रयत्न चालकाकडून केला गेला. गर्दीतून डंपर काढताना महामार्गावरून जाणाऱ्या इंडिका कारचा कट लागल्याने किरकोळ अपघात झाला. यामुळे थोडा वाद झाल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटून डंपरचालकाकडून इंडिकाची नुकसान भरपाई देण्याचे ठरवून वाद मिटविण्यात आला.

साइडपट्ट्यांचे काम दोन दिवसांत - आमदार भोळे
आमदार सुरेश भोळे यांनी मी नागरिक म्हणून उपस्थित असून, दोन दिवसांत साइडपट्ट्यांचे काम सुरू करण्याचे आश्‍वासन महामार्ग प्राधिकरणाने दिल्याचे जाहीर केले. यासंदर्भात पालकमंत्र्यांची बैठक चार फेब्रुवारीनंतर लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

संवेदना आजपुरती नको - महापौर लढ्ढा
शहरातील नागरिकांच्या संवेदना जागृत झाल्या असून, ही संवेदना आजपुरती जागृत न ठेवता प्रश्‍न जोपर्यंत तडीस नेला जाणार नाही तोपर्यंत आम्हा सर्व नागरिकांना भांडावे लागेल, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागेल, सत्यासाठी सत्याग्रहही करावा लागेल, असे मत महापौर नितीन लढ्ढा यांनी मांडले. 

..तर चाळीस वर्षे प्रश्‍न तसाच राहील - अतुल जैन
महामार्ग बनविताना समांतर रस्ते होणे आवश्‍यक होते. पण ते चाळीस वर्षांत झाले नाहीत. राजकारण, जात-पात आपल्या मनातून बाजूला सारले नाही, तर गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्‍न आणखी पुढील चाळीस वर्षे प्रलंबित राहील. अपघात होण्यास समांतर रस्ते नाही, हीच मुख्य समस्या नसून शिस्त पाळणे हेही कारण आहे, असे अतुल जैन म्हणाले. डॉ. राधेश्‍याम चौधरी, कैलास सोनवणे, करीम सालार यांनीही यावेळी मनोगत व्यक्‍त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com