कोट्यवधींच्या शासकीय थकबाकीमुळे महावितरणालाच शॉक!

Mahavitaran
Mahavitaran

येवला - महावितरणाची वीज बिलांची थकबाकी तशी नवीन नाही मात्र सर्वसामान्य ग्राहकांना ऐवजी शासकीय कार्यालये व संस्थांनीच कोट्यवधी रुपये थकविल्याचे समोर आले आहे. यामुळे येथील विश्रामगृह, मुक्तिभूमी आदी संस्थांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत व नगरपालिकेकडे पथदिव्यांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत.

आर्थिक वर्षअखेर असल्याने सर्वांनाच थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा करावा लागतो. त्यातच महावितरण असे कार्यालय आहे की जेथे वर्षानुवर्ष ग्राहकांकडे थकबाकी असते. महावितरणच्या मोहिमेमुळे मार्चला वसुली होत आहे. मात्र शहर व तालुक्यातील सरकारी कार्यालये व संस्थांची थकबाकी कोट्यवधीच्या घरात जाऊनही ही रक्कम भरली जात नसल्याने महावितरणला झळ सहन करण्याची वेळ येत आहे.

मार्च अखेरमुळे गेल्या महिनाभरात महावितरणचे अधिकारी अन् कर्मचारी थकीत वीजबिले वसुलीसाठी एकीकडे रात्रंदिवस परिश्रम करीत असताना शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडील मोठी थकबाकीच्या वसुलीचा मात्र प्रश्न आहे. 

थकबाकीला न जुमानता बिले भरण्यास कार्यालये दाद देत नसल्याने महावितरणच्या वसुलीचा पहिला दणका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाला तसेच मुक्तीभूमीला बसला आहे. जानेवारीपासूचे येथील ५३ हजारांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने अदयापही दिले नाही. त्यामुळे महावितरणाने बुधवारी (दि. २८) शासकीय विश्रामगृहाची वीज पुरवठा खंडीत केला. मुक्तीभूमीचेही ६२ हजाराचे बिल थकल्याने येथील पुरवठा देखील बंद करण्यात आला होता. मात्र समाजकल्याण उपायुक्तांनी अधिकार्याशी संपर्क करत बिल भरणार असल्याचे सांगितल्याने पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. नाट्यगृहाची १४ हजाराची थकबाकी महावितरणने कारवाईचा बडगा उगारताच पालिकेने भरली आहे.

पथदिव्यांची थकबाकी ठरली डोकेदुखी!
तालुक्यात सर्वात मोठी थकबाकी येवला शहरातील पथदिव्यांसह आहे. ग्रामपंचायतिच्या गावोगावच्या पथदिव्यांची ४ कोटी २१ लाख रुपये थकबाकी आहे. नगरपालिकेच्या शहरातील पथदिव्यांचे ३३ लाख रुपये थकलेले असून, महावितरणने याबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. आता नोटीस दिल्याने पालिकेने आठ दिवसांत बिले भरण्याचा शब्द दिला आहे. तर ८९ ग्रामपंचायतिच्या पथदिव्यांचे तब्बल वीजबिल तब्बल ३ कोटी ८८ लाखांवर थकल्याने महावितरण आता कारवाईचा पवित्रा घेत आहे.

"सर्वांनीच वेळेत वीजबिले भरणे हे कर्तव्य आहे. वेळेत बिले न भरल्याने थकबाकी वाढून नाईलाजाने आम्हला कारवाई हाती घ्यावी लागते. आम्ही सर्व थकबाकीदार कार्यालय प्रमुखांना विनंती केली आहे. पालिकेला देखील मोठी थकबाकी असल्याने ती भरण्यासाठी नोटीस दिली असून, नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांना देखील विनंती केली आहे.
राजेश पाटील,उपकार्यकारी अभियंता,येवला

यांनी थकवले विजबिले...

  • शासकीय विश्रामगृह - ५३ हजार
  • तहसील कार्यालय - १६,६५०
  • बीफ मार्केट - ३,६२०
  • आरोग्य अधिकारी कार्यालय - २१७०
  • गटविकास अधिकारीकार्यालय -३०७०
  • एमआरईजीएस कार्यालय - ३२९०
  • जिल्हा परिषद कार्यालय - १५००
  • महात्मा फुले नाट्यगृह - १४३२०
  • शहर पोलिस स्टेशन - ६२ हजार
  • तालुका पोलिस स्टेशन - १६ हजार
  • मुक्तीभूमी - ६२ हजार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com