वीजचोरी रोखण्यासाठी आता ‘फिडर मॅनेजर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुख्य अभियंता जनवीर राबविणार जळगावात पहिला प्रयोग; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये दिलखुलास गप्पा

मुख्य अभियंता जनवीर राबविणार जळगावात पहिला प्रयोग; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये दिलखुलास गप्पा

जळगाव - ‘महावितरण’कडून विजेचा कारभार पाहण्यासाठी यापूर्वी खासगी कंपन्यांना फ्रॅंचायझी दिल्या आहेत. याच धर्तीवर फ्रॅंचायझी नव्हे, तर वीजचोरी रोखण्यासह सर्वच कामे पाहण्यासाठी फिडरनिहाय नियोजन आखले जाईल. त्यानुसार प्रत्येक फिडरसाठी स्वतंत्र एका व्यक्‍तीची ‘फिडर मॅनेजर’ म्हणून नेमणूक करून ते चालविण्याचे काम त्या-त्या ‘फिडर मॅनेजरला’च देण्यात येईल. ही संकल्पना राबविण्याचा जळगावात पहिलाच प्रयोग राहील, अशी माहिती ‘महावितरण’च्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमांतर्गत दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिली. खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांनी श्री. जनवीर यांचे स्वागत केले. श्री. जनवीर यांनी सांगितले, की तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बिल भरणाही अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने फिडरवरील सर्व कामे सांभाळण्यासाठी ‘फिडर मॅनेजर’ नेमण्यात येणार आहेत. ‘फिडर मॅनेजर’ हा दिलेल्या फिडरवरील सर्व वीजग्राहकांकडील बिल वसुली करणे, मीटर बसविणे, तारांवरील आकडे काढणे, चोरीचे प्रमाण कमी करणे, मुख्य म्हणजे त्या फिडरवरील लाइन लॉसचे प्रमाण कमी करण्याचे काम करेल. अशा पद्धतीने काम करण्यापोटी ‘फिडर मॅनेजर’ला मोबदला दिला जाणार आहे.

महिनाभरात भूमिगत लाइनचे काम
तारांवर आकडे टाकून होणाऱ्या वीजचोरीमुळे मागणी आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते. यामुळे लाइन लॉसचे प्रमाण वाढते. अशा पद्धतीने होणारी वीजचोरी थांबविण्यासाठी एकात्मित ऊर्जा विकास प्राधिकरणांतर्गत भूमिगत लाइन व इन्सुलेटेड केबल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजन येत्या २५ मेस होणार असून, एक-दीड महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. भूमिगत लाइनसाठी जिल्ह्यात ६७.६ कि. मी.ची मंजुरी असून, साधारण ११० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रामुख्याने जळगाव शहरात गेंदालाल मिल, सुप्रिम कॉलनी, समतानगर, पिंप्राळा- हुडको या परिसरात काम होणार असून, शहरासाठी वीस कोटी रुपये मंजूर आहेत. तसेच ईबीसी केबलची २२७.५ कि. मी.ची लाइन टाकली जाणार आहे.

बोगस रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर ‘एफआयआर’
वीजबिलांवर चुकीचे रीडिंग येण्याबाबत ग्राहकांकडून तक्रारी येतात. मीटर रीडिंग आणि बिलिंगचे काम एजन्सीकडे देण्यात आले असून, परिमंडळात ४० एजन्सीद्वारे हे काम सुरू आहे. संबंधीत एजन्सींकडे असलेल्या परिसरातील रीडिंग घेतल्यानंतर ‘महावितरण’चा कर्मचारी काही ठिकाणी जाऊन रीडिंग तपासणी करेल. एजन्सीच्या कर्मचाऱ्याने घेतलेल्या रीडिंगमधील ९५ टक्‍के रीडिंग बरोबर असणे अपेक्षित आहे. जर चुकीचे रीडिंग घेतल्याचे आढळल्यास संबंधित बिलाच्या ५० टक्‍के दंड एजन्सीला आकारण्यात येईल. हे प्रकार रोखण्यासाठी संबंधीत रीडिंग घेणाऱ्या व्यक्‍तीने जर बोगस रीडिंग घेतल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध संबंधीत एजन्सीने एफआयआर दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. असे न झाल्यास ‘महावितरण’कडूनच एजन्सीविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे श्री. जनवीर यांनी सांगितले.

ऐंशी हजार फॉल्टी मीटर बदलविणार
मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जाते. आज नवीन इन्फ्राचे मीटर बसविण्यात येते. परंतु अनेक ठिकाणी आजच्या स्थितीत जुन्याच पद्धतीचे चक्रीचे मीटर आहे. जळगाव झोनमध्ये सिंगल फेजचे असे ऐंशी हजार मीटर असून, हे सर्व बदलण्याचे काम केले जाईल. तसेच ज्या ग्राहकाने बिल भरले नाही, अशांचा वीजपुरवठा ॲटोमॅटिक खंडित करण्यासाठी ‘प्रिपेड मीटर’ ही संकल्पना अमलात येणे शक्‍य नाही. कारण कनेक्‍शन तोडण्यासाठी ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्याला जावेच लागते. रिमोटवरून मीटर बंद करणे शक्‍य होणार नाही.

वीज हवी असल्यास बिले भरा
मुळात विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण होते. यातून निर्माण होणाऱ्या लाइन लॉसमुळे भारनियमनाला सामोरे जावे लागते. यात ग्राहकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. कारण वीजबिलाचा भरणा होत नसल्याने लॉसेस वाढतात. यामुळे ग्राहकांनी जर वेळेत बिल भरणा केला, तर त्यांना मुबलक वीज उपलब्ध होऊ शकेल. यामुळे बिल भरण्याबाबत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. जनवीर यांनी यावेळी केले. 

विजेच्या मागणीत वाढ झाल्याने भारनियमन
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा होणाऱ्या विजेच्या मागणीत सर्वसाधारण २००० मेगावॉटने वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत ‘महावितरण’ची विजेची मागणी २३ हजार मेगावॉटपर्यंत पोहोचली असून, वीजनिर्मिती १८ हजार ते १८,५०० मेगावॉट आहे. मागणी आणि पुरवठा यात पाच ते साडेपाच हजार मेगावॉट तफावत असल्याने अतिरिक्‍त भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असून, बुधवारी (३ मे) रात्री ‘बी’ ग्रुपमधील फिडरवरही भारनियमन करावे लागल्याचे श्री. जनवीर म्हणाले.

‘पीएसएलव्ही-३’ इंधन डिझाईन बनविण्यात सहभाग
ब्रिजपालसिंह जनवीर मूळचे सोने (जि. अहमदनगर) येथील आहेत. १९८५-८६ मध्ये ‘आयआयटी’ पूर्ण केले. यानंतर काही वर्षे बजाज ऑटो कंपनीत काम केले. त्यानंतर ‘इस्त्रो’मध्ये सहा महिने काम करताना ‘पीएसएलव्ही-३’ हे प्राथमिक अवस्थेत असताना त्याची इंधन क्षमता सक्षम करण्यासाठी फिअलचे डिझाईन करण्यात जनवीर यांचा सहभाग होता. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये काम करताना माजी राष्ट्रपती (कै.) अब्दुल कलाम यांच्यासमवेत एक तास काम करण्याची संधी मिळाल्याचे श्री. जनवीर यांनी सांगितले.

Web Title: electricity theft control by feeder manager