atikram
atikram

पालिकेच्या आठ तास चाललेल्या मोहिमेत काढली ५०० वर अतिक्रमणे

येवला - मागील दोन आठवडे शहरातील गल्ली बोळात फिरून स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्या अशी तंबी दिल्यानंतर आज पालिकेच्या वतीने विशेष अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पालिकेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी सकाळी व संध्याकाळी मिळून आठ तास ही मोहीम राबवत पाचशेवर छोटेमोठे अतिक्रमणे काढले. पुढील चार दिवस (ता.२० पर्यत) ही मोहीम राबविली जाणार आहे.

दिवस (ता.२० पर्यंत) ही मोहीम राबविली जाणार आहे. ज्याला वाटेल तेथे अनेकजण बांधकाम व व्यवसाय थाटत असल्याने शहराच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. मात्र मागील तीन आठवड्यात नांदूरकरांनी स्वबळावर राबविलेली मोहीम, मोकळे केलेला शनिपटांगण, भाजीबाजाराचे एकत्रीकरण या सर्व गोष्टी शहरात शिस्तीला नवी दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यानंतर शहरातील गल्ली बोळातील अनधिकृत बांधकामांनी गिळंकृत केल्याने आणि सर्वच गटारींवर बांधकामे झाल्याने ते स्वच्छ करता येत नसल्याचे लक्षात आल्यावर नांदूरकरांनी या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. 

मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांकडून सर्व्हे करून घेत या सर्व भागात फिरून नागरिकांना स्वयंफूर्तीने ही वाढीव बांधकामे काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गंगादरवाजा, देवीखुंट, नागड दरवाजा, स्टेट बँक, लक्कडकोट आदि भागातील वाढीव अतिक्रमणे तसेच गटारीवरील पायऱ्या, ढापे अशी ८०० वर बांधकामे नागरिकांनी काढली होती. मात्र काहींनी याकडे कानाडोळा केल्याने व यादरम्यान काहींनी पालिकेकडे अर्ज करून तक्रारी केल्याने पुन्हा ताफ्यासह नांदूरकरानी मोहीम हाती घेतली आहे. सर्वे करून मोहीम निश्चित केल्याप्रमाणे आज बुधवरी सकाळी सात वाजताच नांदूरकरांनी ७५ कर्मचाऱ्यांसह दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर सोबत घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली.

सप्तशृंगी माता मंदिर, नगरपालिका रोड,थिएटर रोड, ताकिया, जुनी नगरपालिका रोड, न्हावी गल्ली, जुने कोर्ट, टिळक मैदान, सराफ बाजार, बालाजी गल्ली, कापड बाजार, शिंपी गल्ली, खांबेकर खुंट, बजरंग मार्केट या ठिकाणी ताफ्यासह मोहीम राबवत गटारीवरील ओटे, ढापे, पायऱ्या, जीने तसेच गटारीवर बांधकाम केलेले गाळे जमीनदोस्त केले. अकरा वाजेपर्यंत तीनशेच्या आसपास छोटे मोठे अतिक्रमणे हटविल्यानंतर दुपारी चार वाजेनंतर ताफ्यासह बुरुड गल्ली, फत्तेबुरुज नाका या भागात मोहीम राबवत दोनशेवर अतिक्रमणे काढली. मोहिमेदरम्यान काही नागरिकांनी सवलत मागून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा स्वतः अतिक्रमणे काढण्याची संधी दिली. 

या मोहिमेमध्ये मुख्य लिपिक बापूसाहेब मांडवडकर, बांधकाम अभियंता अभिजित इनामदार, वसुली विभाग प्रमुख अशोक कोकाटे, आशुतोष सांगळे, श्रीकांत फांगणेकर, नितीन परदेशी, घनशाम उंबरे, सुनील संसारे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्याधिकांनी संपूर्ण पालिकाच या मोहिमेत कामाला लावली आहे. त्यामुळे नगरपालिका कार्यालय आज ओस पडलेले दिसले. काही नागरिक कामानिमित्त कार्यालयात गेले परंतु त्यांना रिकामे हाताने परतावे लागले.

एकमेकांकडे बोट अन विरोधही
या मोहिमेदरम्यान अनेकांनी वेगवेगळे दावे करत अतिक्रमण काढण्याला विरोध केला. तर काहींनी माझे काढले मग त्याचे काढा म्हणत एकमेकांकडे बोट दाखवले. सर्वत्र मोहिमेदरम्यान बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नांदूरकरांसोबत बजरंग मार्केटमध्ये काही व्यावसायिकांचे वाद झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. कर्मचारी व व्यावसायिकांचा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंतही गेला परतू तो मिटविण्यात आला. आता या मोहिमेचा अतिरेक होऊ लागल्याने विरोधाची भूमिका वाढत असून पालकमंत्र्यांपर्यंत तक्रारी देखील केल्या आहेत. काहींनी येवला न्यायालयात देखील धाव घेतली. छोटे व्यावसायिकांसह अनेक रहिवाशांचे अतिक्रमणे हटविले गेल्याने या मोहीमेला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे येथील विंचूर चौफुलीवर नगर-मनमाड महामार्गावर असलेली पोलीस चौकी देखील अतिक्रमणात असल्याने ती पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने काढून घेतली. यासाठी पेट्रोल पंपाच्या बाजूंला त्यांना जागा देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com