अनधिकृत दोन मंदिरे हटविली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

धुळे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू करत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज देवपूरमधील अनधिकृत दोन धार्मिक स्थळे पूर्णतः हटविली, तर इतर अनधिकृत सहा धार्मिक स्थळांच्या पायऱ्या, ओटे काढण्यात आले. त्या- त्या परिसरातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती. 

धुळे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू करत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज देवपूरमधील अनधिकृत दोन धार्मिक स्थळे पूर्णतः हटविली, तर इतर अनधिकृत सहा धार्मिक स्थळांच्या पायऱ्या, ओटे काढण्यात आले. त्या- त्या परिसरातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती. 

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विविध निकषांआधारे राज्य सरकारने अधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार पूर्वीच महापालिकेने सर्वेक्षणाअंती अनधिकृत धार्मिक स्थळे पूर्णतः हटविणे, गरजेनुसार नियमाकुल करणे आणि स्थलांतरित करणे, अशा आशयाची यादी तयार केली. प्रामुख्याने रहदारीला अडथळा ठरणारी अनधिकृत मंदिरे, प्रार्थना स्थळे हटविण्याची कारवाई होत आहे. त्याप्रमाणे महापालिका हद्दीत 
कारवाईला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. चाळीसगाव रोड परिसरातील अनधिकृत जुनी बिलाल मशीद मुस्लीम बांधवांनी स्वतःहून पूर्णतः हटवत कारवाईच्या मोहिमेला सहकार्य केले. नंतर देवपूर भागात आज महापालिकेने कारवाई सुरू केली.    

तोडग्यानंतर कारवाई सुरू
सद्यःस्थितीत शहरातील ४४ अनधिकृत धार्मिकस्थळांच्या स्थलांतराचा प्रश्‍न होता. यावर १४ डिसेंबरला महापालिकेत सुनावणी झाली. संबंधित धार्मिकस्थळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. त्यानुसार कारवाई सुरू झाली. 

आठ ठिकाणी कारवाई
महापालिकेच्या पथकाने आज एकूण आठ ठिकाणी कारवाई केली. देवपूर भागातील चितळे माध्यमिक विद्यालयाच्या कंपाउंडला लागून असलेले साईबाबा मंदिर, तसेच पंचायत समितीजवळील दत्तनगरमधील श्रीदत्त मंदिर पूर्णतः हटविले. याशिवाय नेहरू नगरमधील दत्त मंदिर, गार्डन प्रेसजवळील हनुमान मंदिर, जयहिंद संस्थेच्या कुंभार गुरुजी शाळेजवळील हनुमान मंदिर, नेहरू नगर येथील शनिमंदिर, एसआरपी कॉलनीतील हनुमान मंदिराच्या अडथळा ठरणाऱ्या पायऱ्या अथवा ओटे ‘जेसीबी’च्या साहाय्याने काढून टाकण्यात आले. पंचायत समितीला लागून असलेले दंडेवालाबाबा तपोभूमी, स्मृतिस्थळाचे अतिक्रमण संबंधित प्रतिनिधी स्वतःहून हटवत होते. स्मृतिस्थळाचा जो भाग अडथळा ठरत आहे तो भाग काढून घेत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ॲड. जवाहर पाटील, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
 

शांततेत, विधिवत कारवाई
त्या-त्या धार्मिक स्थळांचे प्रतिनिधी, परिसरातील नागरिक यांना विश्‍वासात घेऊन व कारवाईपूर्वी विधिवत पूजा झाल्यावर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई झाली. त्यामुळे सर्व ठिकाणी शांततेत काम झाले. आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता कैलास शिंदे, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी नंदकुमार बैसाणे, प्रसाद जाधव, ओव्हरसियर सी. एम. उगले, प्रदीप चव्हाण, एन. के. बागूल, प्रकाश सोनवणे, कमलेश सोनवणे, हेमंत पावटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता. आयुक्त धायगुडे यांनी पाहणी केली.