आईला गुंतवा कुठल्या तरी छंदात

- प्रशांत कोतकर
बुधवार, 8 मार्च 2017

नाशिक - वेळेआधी रजोनिवृत्ती (ऋतुचक्र) या विषयाकडे डॉक्‍टरांसह काही संस्थांनीही गांभीर्याने पाहण्यास सुरवात केली आहे. वेळेआधी रजोनिवृत्ती प्राप्त होणाऱ्या महिलांमध्ये भावनिक अस्थैर्य, हळवेपणा वाढतो; काहींना उगाच रडावेसे वाटते; काहींना उगाच राग येतो व त्यांच्यात चिडचिडेपणा वाढतो, असे स्त्रीरोग व मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या पाहणीत दिसून आले आहे. अशा महिलांना कुठल्या तरी छंदात गुरफटून ठेवणे हे महत्त्वाचे असून, यात कुटुंबाचा आपलेपणाही महत्त्वाचा ठरणार आहे.

"स्क्रोल डॉट इन' यांनी केलेली पाहणी व नाशिकसह जळगावातील विविध तज्ज्ञांशी केलेल्या संवादात अशा महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांमध्ये हृदयविकाराचा, तसेच मेंदूमध्ये रक्तस्राव, रक्तदाब वाढणे, हाडे ठिसूळ होणे, विस्मरण, एकाग्रता कमी होणे, केस गळणे, त्वचा शुष्क होणे, स्तनांचा आकार कमी होणे, पोटावर चरबी गोळा होणे, बद्धकोष्ठता, डोके दुखणे, गरगरणे, सांधे दुखणे, कमी ऐकू येणे, दृष्टिदोष यांसारखे त्रास काहींना जाणवत असल्याचे आढळून आले आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले, की साधारण 30 टक्के स्त्रियांना रजोनिवृत्तीचा फारसा त्रास होत नाही. काहींना तीव्र स्वरूपाचा, तर काहींना ही अवस्था प्राप्त होण्याआधीच काही वर्षांपासून त्रास सुरू होतो. रजोनिवृत्तीपूर्वीच दोन ते तीन वर्षे आधी त्रास सुरू होतो; तर काही स्त्रियांमध्ये दहा वर्षे आधीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाळीची अनियमितता हे प्राथमिक लक्षण दिसून येते. त्यांची पाळी एकतर दोन ते तीन आठवड्यांत किंवा 40 दिवस ते काही महिने उशिरा येत असते.

तसेच, ऋतुचक्र निवृत्तीचे इतर त्रास जाणवायला लागतात. जसे एकदम गरम होऊन येणे व शरीरात अचानक उष्णतेचा प्रवाह निर्माण होऊन तो एकतर चेहरा, मान, छाती असे क्रमाक्रमाने खाली, नाही तर खालून वर वाहणे; तर काही स्त्रियांना त्वचा लाल होऊन पुरळ येणे आणि अचानक छाती धडधडणे, अस्वस्थता वाटणे, घाबरल्यासारखे होणे अशा स्वरूपाचा त्रास जाणवतो. अशा वेळी चित्त स्थिर व मन शांत ठेवणेच फायद्याचे असते. काहींना रात्री घाम येऊन झोप व्यवस्थित लागत नाही, उगाचच चिंता वाटते, अनिद्रेचाही त्रास होऊ शकतो. यासाठी बिछाना आरामदायक असावा व हवेशीर खोलीत झोपावे.

वारंवार लघवी लागणे, मूत्रमार्गाचा दाह होणे, मूत्राशयात वारंवार इन्फेक्‍शन्स होणे, लघवीवर ताबा नसणे, तसेच जोराने हसल्यास, शिंक- खोकला आल्यास लघवी होऊन जाणे आदी त्रास होत असल्याचे दिसून आले आहे.

महिलांनी आपापल्या त्रासानुसार वैद्यकीय सल्ला घेऊन रक्त तपासणे व त्यात आलेल्या अहवालाप्रमाणे औषधोपचार करणे महत्त्वाचे असते. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीत अल्प प्रमाणात हार्मोन्स दिले जातात. पण, ही थेरपी फार काळ घेणे योग्य नसते. हार्मोन्स नसलेली इतर काही आधुनिक औषधेही उपयोगी ठरतात.
- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ, नाशिक