शेतात विजेच्या धक्‍क्‍याने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

शेतात विजेच्या धक्‍क्‍याने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

एरंडोल/चाळीसगाव - सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी वीजतारा वादळाने तुटून पडत आहेत, तर कुठे खांबांमध्येच वीजप्रवाह उतरल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांनी आज जिल्ह्यात दोघांचा बळी घेतला. पहिल्या घटनेत पिंप्री बुद्रुक (ता. एरंडोल) शेतशिवारात तुटून पडलेली वीजतार काठीच्या साहाय्याने बाजूला सारत असताना तारेचा धक्का लागून शेतमजुराचा मृत्यू झाला; तर दुसऱ्या घटनेत शेतातील वीजखांबाला ताण दिलेल्या तारेत वीजप्रवाह उतरल्याने धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देशमुखवाडी (ता. चाळीसगाव) येथे घडली.

पिंप्रीत शेतमजूर ठार
शेतात काम करत असताना शेतातील पडलेल्या तारेचा धक्का लागल्यामुळे तेवीसवर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी अकरापूर्वी पिंप्री बुद्रुक शिवारात घडली. विजेचा धक्का लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आदिवासी शेतमजुरास तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्याच्यावर योग्य ते उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पिंप्री बुद्रुक (ता. एरंडोल) येथील ईश्वर बंडू पाटील यांच्या गट क्रमांक १००/१ मधील शेतात दिनेश पटवारी आहिरे (पावरा) (वय २३, रा. गोवारी, ता. सेंधवा, जि. बडवानी) हा काम करत होता. काम करत असताना शेतात पडलेली विजेची तार तो काठीच्या साहाय्याने बाजूस करत असताना त्यास विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे तो तारेस चिकटला. शेतात काम करणाऱ्या दुसऱ्या मजुरांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी प्लास्टिक पाइपच्या साहाय्याने त्यास तारेपासून वेगळे केले. गंभीर अवस्थेत त्यास एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे वेळेवर उपचार होऊ न शकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे एका निष्पाप आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू होती. मृत आदिवासी शेतमजुराची अशिक्षित पत्नी हताशपणे रुग्णालयाच्या आवारात सुमारे दोन तास बसून केवळ आपल्या पतीची तब्येत कशी आहे, असे येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींकडे आक्रोश करून चौकशी करीत होती. याबाबत नारायण तुळशीराम पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर लहारे तपास करीत आहेत.

देशमुखवाडीत एकुलत्याचा मृत्यू
चाळीसगाव - ज्या खांबावर काल (ता. २५) एका तरुणाला विजेचा धक्का लागून तो जखमी झाला. त्याच खांबाचा शॉक लागून आज २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देशमुखवाडी (ता. चाळीसगाव) येथे घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये वीज कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आकाश अर्जुन पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. आपल्या आई- वडिलांचा एकुलता असलेल्या आकाशचा मृत्यू शेतात त्यांच्या डोळ्यांदेखत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा बळी
देशमुखवाडी येथील टाकळी प्र. दे. रस्त्यावर अर्जुन पाटील यांचे शेत आहे. या शेतातील विजेच्या खांबाला दिलेल्या ताणाच्या तारेवर काल (ता. २५) सकाळी विजेचा प्रवाह उतरला होता. सायंकाळी चेतन देशमुख हा तरुण शेतातून परत येताना याच तारेला तो चिकटला. सुदैवाने त्याचवेळी विजेचे भारनियमन सुरू झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून चेतन वाचला. मात्र, तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर वीज कंपनीने या घटनेची दखलच घेतली नाही. त्यामुळे तारेवर वीज प्रवाह कायम होता. आज त्या ठिकाणी अर्जुन पाटील हे पत्नी व मुलांसह शेतात मशागतीचे काम करीत होते. त्यावेळी मुलगा आकाश हा त्याच तारेला चिकटला. त्याच्या आई- वडिलांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला. केवळ वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आकाशचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com