पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीचे 3 सदस्य अपात्र

pipmalgaon grampanchayat election issue
pipmalgaon grampanchayat election issue

इगतपुरी : तालुक्‍यात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांना नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अपात्र केले. ग्रामपंचायतीच्या कामकाजात विविध प्रकरणी आरोप करून ग्रामपंचायत सदस्य दत्तू बाजीराव काळे यांनी निवडणूक विवाद दावा दाखल केला होता. जिल्ह्याच्या इतिहासात तब्बल 21 वेळा सुनावणी झालेल्या याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. अपात्र झालेल्या सदस्यांत भाजप नेत्याची पत्नी व समर्थक असल्याने इगतपुरी तालुक्‍यात चर्चेला उधाण आले आहे. 

पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या सदस्या अलका काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलाच्या नावे ठेकेदारीची कामे केली. शिवाजी नंदू मेंगाळ या ग्रामपंचायत सदस्याने शौचालय नसतानाही दिशाभूल केली. सोबतच ठेकेदार म्हणूनही कामे केली. ग्रामपंचायत सदस्या अलका चंद्रकांत पगारे यांनी शौचालय न बांधता दिशाभूल केली. या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांविरोधात ग्रामपंचायत सदस्य दत्तू बाजीराव काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह निवडणूक विवाद दावा दाखल केला होता. या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेण्यात आला. तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांवर केलेले आरोप सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अलका संपत काळे, शिवाजी नंदू मेंगाळ, अलका चंद्रकांत पगारे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरवून रद्द केले. 

इगतपुरी तालुक्‍यातील भाजपचे नेते संपत काळे यांच्या पत्नी अलका काळे यांच्यासह इतर दोन समर्थकांवरील कारवाई तालुक्‍यात चर्चेचा विषय आहे. पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीत भाजपचे संख्याबळ एकवर आले असून, याही सदस्यावर दावा दाखल असल्याने त्यावर टांगती तलवार आहे. दत्तू काळे यांच्यातर्फे ऍड. डी. एस. निकम यांनी कामकाज पाहिले. 

दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव मोर सोसायटीचे अध्यक्ष पंढरीनाथ काळे, ग्रामस्थ संपत कदम, शिवाजी काळे, उमेश बेंडकोळी, धनराज बेंडकोळी, गोटीराम काळे, जीवन गातवे, रमेश कदम नंदू बांगर, भरत बेंडकोळी, श्‍याम कुलाळ, रमेश बेंडकोळी, जगन बेंडकोळी, लक्ष्मण काळे, गणपत कदम, राजाराम काळे आदींनी निकालाचे स्वागत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com