समाधानकारक पावसामुळे चणकापूर, गिरणा धरणांत पुरेसा साठा

girna dam water
girna dam water

मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारा तळवाडे साठवण तलाव अजूनही ओव्हरफ्लो आहे. त्यामुळे चणकापूरमधून मालेगावसाठी पहिल्या आवर्तनाची गरज फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भासू शकेल. समाधानकारक पावसामुळे फेब्रुवारीत पहिले आवर्तन घेण्याची गेल्या पंधरा वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, महापालिकेने चणकापूरमधून एक हजार 900, तर गिरणा धरणातून 900 दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

चणकापूर व पुनंद धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे गिरणा नदी कमी-अधिक प्रमाणात तब्बल तीन महिने वाहिली. गिरणा डावा कालवाही वाहत राहिला. परिणामी तळवाडे साठवण तलावातील जलसाठा कायम राहिला. पावसाळा संपला तरी परतीच्या पावसामुळे ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यात साचलेले पाणी डाव्या कालव्याला सुरू आहे. त्यामुळे विस्तारीकरणानंतर तळवाडे तलावातील साठा 87 दशलक्ष घनफुटांवर कायम आहे. उपलब्ध पाणी अजून अडीच महिने सहज पुरणार आहे. पहिले आवर्तन फेब्रुवारीत घेण्याची गरज भासेल.

महापालिकेने चणकापूरमधून चार आवर्तने गृहीत धरून एक हजार 900 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. गेल्या वर्षी एक हजार 400 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित होते. या वर्षीही 1200 ते 1400 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर होऊ शकेल. उपलब्ध पाणी पाहता 31 जुलैपर्यंत दोन किंवा तीन आवर्तनांची गरज भासेल. मालेगावसाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा कसमादेतील लहान-मोठ्या 52 पाणीपुरवठा योजनांना होतो. मालेगावला गिरणा धरणातूनही जलवाहिनीद्वारे थेट पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी 900 पैकी 800 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर झाले होते. या वर्षी गिरणा धरण 71 टक्के भरले असून, धरणात 16 हजार 141 दशलक्ष घनफूट साठा आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे 900 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर होईल. 

दोन आवर्तने शक्‍य 
चणकापूर धरणातून शेतीसाठी दहा वर्षांत एकच आवर्तन दिले जात आहे. या वर्षी परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला. पूरपाण्याने जवळपास दोन महिने गरज भागविली. तळवाडे तलाव विस्तारीकरण झाला आहे. चणकापूर ओव्हरफ्लो आहे. त्यामुळे या वर्षी शेती व पिण्यासाठी दोन संयुक्त आवर्तने मिळण्याची दाट शक्‍यता आहे. पुरेशा पाण्याअभावी रब्बी हंगाम कमी होत आहे. दोन आवर्तने मिळाल्यास रब्बीचे उत्पन्न वाढू शकेल. शिवाय उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळाही कमी बसू शकतील. चणकापूरमधून दोन आवर्तनांची शेतकऱ्यांची मागणी कायम आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com