जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाने अवयवदान करावे : डॉ. मोरे

जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाने अवयवदान करावे : डॉ. मोरे

सटाणा : मृत्यूनंतर एक देह काही व्यक्तींच्या जीवनात आशेचा किरण ठरू शकतो तर अनेकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर शरीराची राख होऊन सारे नष्ट होते. अवयवरुपी जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाने अवयवदान केले पाहिजे, असे आवाहन नाशिकच्या ऋषिकेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी येथे केले.

येथील कृती फाउंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त राधाई मंगल कार्यालयात आयोजित 'जागर अवयवदानाचा' या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मोरे बोलत होते.

अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील देशपांडे, फाउंडेशनच्या अध्यक्षा एड. सरोज चंद्रात्रे, नगरसेविका डॉ. विद्या सोनवणे, क्लबच्या अध्यक्षा रुपाली कोठावदे, डॉ. मनोहर सोनवणे, श्रीधर कोठावदे, यशवंत अमृतकार, अरविंद सोनवणे, एड. दिलीप चंद्रात्रे, नितीन मुंडावरे, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.

मृत्यूनंतर एक देह सात जणांच्या आयुष्यात आशेचा एक किरण ठरू शकतो. अवयवदान हे केवळ डोळे किंवा किडनीपुरता मर्यादित नसून, शरीराचे 7 विविध अवयव आपण दान करू शकतो. प्रत्येकाने अवयवदानाविषयी जनजागृती करावी, असेही डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.

सुनील देशपांडे यांनी देशात 2 हजार किलोमीटर पदयात्रा करीत पत्रके वाटून, भारुडे व प्रवचने सादर करून सर्वसामान्य जनतेपर्यंत अवयवदानाची जनजागृती केल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सामुदायिक शासनमान्य अवयवदान प्रतिज्ञा घेतली. कृती फाउंडेशनच्या अध्यक्षा एड. सरोज चंद्रात्रे यांनी प्रास्ताविकात 'जागर अवयवदानाचा' या उपक्रमाविषयी माहिती देऊन अवयवदान करण्याचे आवाहन केले.

डॉ. विद्या सोनवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अवयवदान जनजागृतीपर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमास सुजाता पाठक, छाया सोनवणे, भारती अंधारे, अपेक्षा चव्हाण, शीतल जाधव, वंदना सोनवणे, रुपाली जाधव, स्मिता येवला, विमल मुंडावरे, मीनाक्षी जाधव, योगिता देवरे,  डी. बी. सोनवणे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कल्पना पवार यांनी सूत्रसंचालन केले तर रुपाली जाधव यांनी आभार मानले. 

दरम्यान, या उपक्रमाअंतर्गत लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभातफेरी काढून अवयवदानासंदर्भात जनजागृती केली. यावेळी फेरीत विद्यार्थ्यांनी विविध घोषणाबाजीही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com