शिवसेनेतर्फे जुलैमध्ये शेतकऱ्यांचा 'लॉंग मार्च'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नाशिक - शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. 19) नाशिकला कृषी अधिवेशनात समविचारी पक्षांना सोबत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकणार आहेत. जुलैमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या "लॉंग मार्च'सह शेतकरीप्रश्‍नांवर भूमिका मांडणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिली.

नाशिक - शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. 19) नाशिकला कृषी अधिवेशनात समविचारी पक्षांना सोबत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकणार आहेत. जुलैमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या "लॉंग मार्च'सह शेतकरीप्रश्‍नांवर भूमिका मांडणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिली.

शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाच्या तयारीसाठी देसाई, राऊत, संपर्कप्रमुख अजय चौधरी आदींसह पदाधिकारी आज नाशिकला आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. देसाई म्हणाले, की कृषी अधिवेशनात उद्धव ठाकरे, खासदार राजू शेट्टी, वनाधिपती विनायकदादा पाटील आदींसह शेतकरी संघटनांचे विविध पदाधिकारी व्यासपीठावर असतील. "शेतकरी हाच पक्ष' या भूमिकेतून राजकारण न आणता हा विषय पुढे गेला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेच्या दृष्टीने शेतकरी हा राजकीय विषय नाही. आम्ही सत्तेत असलो तरी आमच्या दृष्टीने वेदना महत्त्वाची आहे. निसर्ग, शासन, प्रशासन, धोरण असे अनेक पदर या विषयाला आहेत.

'ते' शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आमच्यासोबत
खासदार राजू शेट्टी शिवसेनेने; तर सदाभाऊ खोत भारतीय जनता पक्षाने वाटून घेतले का? या प्रश्‍नावर देसाई यांनी, शेतकरी हा राजकारणाचा विषय नाही. आम्ही सत्तेत असताना आंदोलने केली आहेत. शेतकरीप्रश्‍नांवर आम्ही समविचारी अशा सर्वांबरोबर असू. एक जूनपासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्या शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आमच्यासोबत दिसतील, असाही दावा त्यांनी केला.

'समृद्धी'बाबत भूमिका मांडणार
जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार आणि समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाण्याचा विषय याविषयी शिवसेनेची भूमिका शुक्रवारच्या अधिवेशनात पक्षप्रमुख स्पष्ट करतील, असे सांगून खासदार राऊत यांनी तूरखरेदीच्या विषयावर सरकार गोंधळलेले आहे. तूरखरेदीत शेतकरी तोट्यात आणि व्यापारी फायद्यात असे पुढे येत आहे. अशा सर्व प्रश्‍नांवर शुक्रवारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल.

शिवसेना नेत्यांचे आरोप
-जुलैमध्ये शेतकऱ्यांचा अधिवेशनावर "लॉंग मार्च'
-मुख्यमंत्री- अर्थमंत्री देणारे, आम्ही फक्त पाठिंबा देणारे
-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत
-तूरखरेदीत व्यापारी लाभात, सरकार गोंधळलेल्या स्थितीत