शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ - शरद पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

भडगाव - गेल्या साडेचार वर्षांत तेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची धडपणे अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पीक कर्जाचे ओझे डोक्‍यावर आहे. पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ या राज्यकर्त्यांनी आणली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज केली. 

माजी पंतप्रधान राजीव गांधींनी बोफोर्स तोफांच्या संदर्भात केलेल्या कराराबाबत त्यावेळी विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र, सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या राफेल विमानांच्या कराराचे प्रकरण त्यापेक्षाही अतिगंभीर आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, की केंद्रातील सरकारला साडेचार वर्षे झाली आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी केलेल्या केलेल्या कोणत्याही घोषणांची पूर्तता झाली नाही. देशातून बाहेर गेलेला काळा पैसा आणून देशातील गरिबी कमी करण्याची घोषणा मोदींनी केली. सत्तेवर आल्यानंतर ते स्वित्झर्लंडला गेलेही; मात्र त्यांना तेथून हात हलवीत परत यावे लागले. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी नोटाबंदीची घोषणा केली. परंतु, त्यातूनही काळा पैसा बाहेर आलाच नाही. उलट गरिबांना त्याची मोठी झळ सोसावी लागली, ते अद्यापही त्यातून बाहेर आलेले नाहीत. 

भडगाव येथील रजनतीताई देशमुख विद्यालयाच्या मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी या विद्यालयाच्या इमारतीचे अनावर शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर याच ठिकाणी पक्षाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय वाघ यांनी केले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. 

एकजुटीने परिवर्तन घडवा
देशाच्या विकासाचा कोणताही अजेंडा सरकारसमोर नाही. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किमती, रुपयाचे अवमूल्यन तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची न मिळणारी किंमत हा राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचा परिणाम आहे. आता देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट करून शक्ती निर्माण करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com