शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 तासांत पैसे जमा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नाशिक - चलनाचा तुटवडा आणि क्‍लिष्ट बॅंकिंग प्रणालीतून शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा प्रश्‍न सुटावा म्हणून बाजार समित्यांसाठी "चेक क्‍लिअरिंग सिस्टीम' राबवण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 तासांत पैसे जमा होतील. यासंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी ही माहिती बैठकीनंतर दिली. ते म्हणाले, की बाजार समित्यांमधील व्यवहारांमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धनादेश द्यावे लागणार आहेत; पण त्या तुलनेत बॅंकांकडून पुरेसे धनादेश उपलब्ध होणार का ही समस्या आहे. शिवाय बॅंकेत धनादेश जमा झाल्यावर वटणावळीच्या प्रक्रियेला वेळ लागतो. म्हणूनच "चेक क्‍लिअरिंग सिस्टीम' राबवण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीसाठी आठ बाजार समित्या आणि आठ बॅंकांची निवड करण्यात आली आहे. सहकार विभागातर्फे प्रत्येक बाजार समितीसाठी एक अधिकारी दिला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे नाव, बॅंक खाते क्रमांक याची बॅंकनिहाय यादी द्यायची आहे; तसेच सोबत दिवसभरातील खरेदी केलेल्या मालाच्या रकमेपोटीचा संबंधित बॅंकेचा एक चेक द्यायचा आहे. 

लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला सहकार विभागाचे अधिकारी धनादेश आणि यादी बॅंकांच्या अधिकाऱ्यांकडे सोपवतील. त्यानुसार संबंधित बॅंकेचे अधिकारी जिल्हास्तरावरून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग करतील. मग शेतकरी बॅंकेतून प्रचलित नियमावलीनुसार खात्यातून पैसे काढून घेऊ शकतील. 

योजनेचा होणार विस्तार 

जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांमध्ये नवीन प्रणालीला मिळणारा प्रतिसाद पाहून उरलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये योजनेचा विस्तार केला जाईल. सध्याच्या प्रणालीत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक केली जाईल, असेही करे यांनी सांगितले. 

Web Title: Farmers deposit money account in 24 hours