बळिराजा जाणार 1 जूनपासून संपावर

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी शेतमालाच्या भावासाठी अनेक वेळा आंदोलने केली; परंतु तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही, असा सूर बैठकीतून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे "आता बस्स! शेतकऱ्यांनो, चला संपावर' अशी हाक देण्यात आली आहे

नाशिक - शेतमालाला भाव नसल्याने आधीच कोलमडलेला बळिराजा अवकाळी, गारपीट अशा दुष्टचक्रात अडकला आहे, त्यामुळे राज्यभरातील शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. संभाव्य संप शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी रविवारी समन्वय बैठक झाली. किसान क्रांती मोर्चाद्वारे या संपाचे नियोजन करण्यात आले असून, तो यशस्वी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.

यंदा सर्वच पिकांचे चांगले उत्पादन निघाल्याने बळिराजा प्रथम सुखावला होता; परंतु द्राक्षापासून कोणत्याही पिकाला भावच नसल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. पर्यायाने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आजची बैठक घेण्यात आली. राज्यभरातून निवडून गेलेल्या खासदार - आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी निवडून गेले आहेत. दुर्दैवाने शेतकरी निरनिराळ्या पक्षांमध्ये विभागला गेल्याने शेतकऱ्यांची ताकद कमी पडते.

मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी शेतमालाच्या भावासाठी अनेक वेळा आंदोलने केली; परंतु तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही, असा सूर बैठकीतून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे "आता बस्स! शेतकऱ्यांनो, चला संपावर' अशी हाक देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा समित्यांची स्थापना केली आहे. या बैठकीला निफाड, ओझरखेड, दिंडोरी, देवळा, पेठ, कोळगाव व नाशिक तालुक्‍यांतून शेतकरी उपस्थित होते.

बळिराजाला हवंय काय...
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
- स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी
- दुधाला प्रतिलिटर 50 रुपये भाव
- शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज
- साठ वर्षांनंतर पेन्शन सुरू व्हावी
- शेतीसाठी अखंड वीजपुरवठा
- ठिबक सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान

Web Title: Farmers to go on strike?