वन विभागात पावणेपंधरा लाखांचा गैरव्यवहार! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नंदुरबार - वन विभागात वृक्षारोपणासाठी आवश्‍यक असलेली माती, शेण, रेती, माठासह अन्य वस्तूंच्या बनावट खरेदीतून सुमारे 14 लाख 75 हजारांचा गैरव्यवहार करण्यात आला. याबाबत तत्कालीन वनक्षेत्रपालाविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. रोजगार हमी योजनेंतर्गत खर्चातून हा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकाराने वन विभागासह हमी योजनेशी निगडित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2012-13 या आर्थिक वर्षात वन विभागाला निधी प्राप्त झाला होता. त्यात कुशल कामासाठीच्या निधीत गैरव्यवहार करण्यात आला. याबाबत खातेंतर्गत अनेक पत्रव्यवहार, वरिष्ठांची परवानगी, संबंधित बाबींची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीनंतर आज पहाटे तालुका पोलिस ठाण्यात या गैरव्यवहाराबाबत नोंद करण्यात आली. 

घायपात कंद, बी- बियाणे, शेणखत, बारीक रेती, गाळमाती, रासायनिक खते, फोटो, पॉलिथिन सीट, बांबू काठी, मातीचे माठ, हार्डवेअर आदी साहित्यांची खरेदी करणे आवश्‍यक होते. या वस्तूंची प्रत्यक्षात खरेदी न करता तसेच देयके काढण्यात आली. त्यात 2012-13 च्या निधीत 14 लाख 75 हजार 496 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. 

हमी योजनेंतर्गत कुशल कामासाठी या वस्तूंची गरज असते. त्यात वृक्षारोपणासाठी रोपे तयार करणे, विविध बियाण्यांच्या सहाय्याने नवनवीन प्रजातींची रोपे तयार करणे, रोपांचे संरक्षण करणे, त्यांना खत देणे आदी बाबींसाठी या वस्तूंची खरेदी करण्याचे वन विभागाकडून आदेश असतात. त्या सर्व वस्तूंची खरेदी तत्कालीन वनक्षेत्रपाल अशोक मदन प्रकाशकर यांच्या अखत्यारीत, निगराणीखाली होणे अपेक्षित होते. त्यानुसार वैंदाणे, ठाणेपाडा, वाघाळे, अक्राळे, आष्टा, तलवाडे, नांदरखेडा, अजयपूर, अंबापूर, सुतारे आदी गावांतील वन विभागाशी निगडित कामांसाठी या वस्तूंची खरेदी होणे अपेक्षित होते. ती खरेदी केली नसताना देयके काढण्यात आली. 

याबाबत शासकीय रकमेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका अशोक प्रकाशकर यांच्यावर खातेंतर्गत प्राथमिक चौकशीत ठेवण्यात आला. त्यानुसार आज सहाय्यक वनसंरक्षक (प्राणी व वन्यजीव) गणेश रामहरी रणदिवे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 14 लाख 75 हजार 496 रुपयांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तत्कालीन वनक्षेत्रपाल अशोक मदन प्रकाशकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत.