crime
crime

पाच लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी चार अभियंत्यांवर गुन्हा दाखल

येवला : तालुक्यातील आठ ठिकाणी अंगणवाडी बांधकामात अधिकारी व ठेकेदारांनी एमबीचे बनावटीकरण करुन तो खरा असल्याचे दाखवित तब्बल पाच लाखाच्या शासकीय रकमेचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी आज येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता या चार अधिकार्‍यांसह ठेकेदारांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.विशेष म्हणजे सात वर्षानंतर याप्रकरणाला वाचा फुटली आहे.

दोन दिवसांपुर्वी येथे पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णय घेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली होती.याचवेळी त्यांनी अंगणवाडी बांधकामातील अनियमितता असल्याचे पडताळणीमध्ये दिसून आल्याने दोषीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार आज तालुका पोलीस ठाण्यात येथील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्‍वर वाघ यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एल. ताटीकोंडलवार यांनी दिली.या प्रकरणी तत्कालीन शाखा अभियंता के. यु. उशिर, उपअभियंता वसंत वाईकर, कनिष्ठ अभियंता दशरथ चकोर व शाखा अभियंता प्रकाश सोनवणे यांच्यासह कामे करणार्‍या ठेकेदारांविरोधात शासनाच्या रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांपैकी एक जन निलंबित तर एक सेवानिवृत्त झालेला आहे.तरीही चौकशीचे ससेमिरा मागे लागल्याने व थेट गुन्हा दाखल झाल्याने अश्या आपमार्गाने संपत्ती जमविणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

अंगणवाडी बांधकामासाठी पंचायत समितीचे ईवदचे उपअभियंता यांच्या कार्यालयाकडून मंजुर आराखड्याच्या वर्क ऑर्डर प्रमाणे बांधकाम केले जाते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व अहवालानंतर या कामाचे स्वरुप ठरते. सदरच्या अंगणवाडीच्या ईमारत बांधकामासाठी तांत्रिक मान्यता देऊन काम वाटप समितीच्या शिफारशीनुसार मागणी केलेल्या मजुर संस्थेला सबंधित कामाची वर्क ऑर्डर दिली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. या निकषानुसार २०१०-११ मध्ये कुसमाडी दगडीचा माळ, नायगव्हाण भैरवनाथ मंदिर, नगरसूल रेल्वे स्टेशन व महादेव मंदिर, धामोडा नित्यानंद नगर, कोळगाव कानिफनाथ नगर, अंदरसूल क्रमांक ३, सावरगाव व गोपाळवाडी या आठ ठिकाणी अंगणवाडी बांधकाम करण्यात आले. या कामाचे बिले देखील सबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आली होती. मात्र, या आठही ठिकाणी कामात अनियमितता असल्याच्या तक्रारी झाल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्या ठिकाणची पुन:पडताळणी केली.

तत्कालीन अधिकार्‍यांनी या बांधकामाच्या ठिकाणी मोजमापे घेऊन अंदाजपत्रकानुसार तपासणी केली. यावेळी अधिकारी व ठेकेदारांनी एमबी चे बनावटीकरण करुन तो खरा असल्याचे दाखविले. या चौकशीत कुसमाडी येथे ५९ हजार ५५०, नायगव्हाण येथे ५२ हजार ५००, नगरसूल येथे ५० हजार ४०० व ४८ हजार ४२३, धामोडा येथे १ लाख १९ हजार, कोळगाव येथे ५२ हजार ३४८, अंदरसूल येथे ५३ हजार ३५५ आणि सावरगाव- गोपाळवाडी येथे ६७ हजार ४८४ असे एकूण ५ लाख ३ हजार रुपयांची अनियमितता आढळली असल्याने हि कारवाई झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com