आई तुळजाभवानी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी आसिफ मिर्झा...

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुस्लिम समाजातील व्यक्तीला एखाद्या सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्षपद देण्याची ही तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील आई तुळजाभवानी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आसिफ मियाबेग मिर्झा यांची एकमताने निवड झाली असून मुस्लिम समाजातील व्यक्तीला एखाद्या सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्षपद देण्याची ही तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण वाणी, भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र वाणी व माजी उपसरपंच ताहीरबेग मिर्झा आदींनी भाजप व शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह गणेश मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करुन हिंदू-मुस्लिम एकोप्याचा संदेश देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला आई तुळजाभवानी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्षपद देण्याची सूचना मांडली. त्याला सर्वांनी एकमुखी अनुमोदन दिले.

शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आसिफ मिर्झा यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र वाणी, सचिवपदी हेमंत बेंद्रे तर खजिनदारपदी गणेश पाटील यांची निवड झाली. सदस्यपदी सतीश वाणी, त्रिलोक दवे, मनीष जगताप, नरेंद्र शिंपी, राहुल पाटील, मनोज मुसळे, तुषार भामरे आदींची निवड झाली. येथील श्रीगणेशाचे सातव्या दिवशी विसर्जन केले जाते. ह्यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाज बांधवांकडून चौकाचौकात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व गणेश भक्तांचे अल्पोपहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार व स्वागत केले जाणार आहे. आसिफ मिर्झा यांच्या निवडीचे माळमाथा परिसरातून विशेष स्वागत होत आहे.