लोकसहभागातून ‘घटबारी’चे काम पूर्णत्वास

खुडाणे (ता. साक्री) - डोमकानी शिवारातील घटबारी धरणाच्या दुरुस्तीनंतर विहिरीत झालेल्या साठ्याची पाहणी करताना युवा कार्यकर्ते पराग माळी, उपसरपंच नामदेव गवळे, ग्रामपंचायत सदस्य कन्हय्यालाल काळे, शेतकरी महेंद्र हेमाडे, भूषण शिरसाट आदी.
खुडाणे (ता. साक्री) - डोमकानी शिवारातील घटबारी धरणाच्या दुरुस्तीनंतर विहिरीत झालेल्या साठ्याची पाहणी करताना युवा कार्यकर्ते पराग माळी, उपसरपंच नामदेव गवळे, ग्रामपंचायत सदस्य कन्हय्यालाल काळे, शेतकरी महेंद्र हेमाडे, भूषण शिरसाट आदी.

निजामपूर - डोमकानी (ता. साक्री) शिवारातील तीन ऑक्‍टोबर २०१६ ला रात्री झालेल्या अतिवृष्टीने फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच दुरुस्त झाले. आबालवृद्धांनी २० मे २०१७ ला सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी काम जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केले. ५६ लाखांचे काम केवळ आठ ते दहा लाखांत पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही आश्‍चर्य व्यक्त केले.

फुले कृषी प्रतिष्ठानचे सहकार्य
घटबारी धरणाच्या उभारणीसाठी औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानतर्फे चार लाख, तर देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशनतर्फे दीड लाखाची भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. लोकवर्गणीतून सुमारे तीन-साडेतीन लाख रुपये निधी जमवून ५६ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले हे धरण सुमारे नऊ लाखांत पूर्ण झाले.

हजारावर शेतकऱ्यांचा लाभ
दुरुस्ती झालेल्या घटबारी धरणामुळे सुमारे चार ते पाच हजार एकर जमीन पुन्हा ओलिताखाली आली असून, हजारावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. धरणाच्या परिसरातील विहिरींमध्ये अवघ्या पाच ते दहा फुटांवर जलसाठा आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. गहू, हरभरा, कपाशी, कांदा, मिरची, डाळिंब, मका, भुईमूग, भाजीपाला आदी पिके घेतली जातात.

जनावरांसाठी पाण्याची सोय
घटबारी धरणातील साठ्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली आहे. खुडाणे व डोमकानी ही दोन्ही गावे वगळता अन्यत्र पाच किलोमीटर परिसरात जनावरांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने घटबारीमुळे ती समस्या निकाली निघाली आहे. साधारण जून-जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा आज धरणात शिल्लक आहे.

पंचनामे होऊनही भरपाई नाही
घटबारी धरण फुटल्यानंतर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकर शेतजमिनीचा पंचनामा झाला होता. परिसरातील शेतकऱ्यांच्या सुमारे सहाशे विहिरी बुजल्या गेल्या उभी पिके नष्ट झाली होती. जनावरे मृत्युमुखी पडली होती; परंतु शासनाकडून आजतागायत एक पैसाही मोबदला मिळालेला नाही, अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

नुकसानभरपाई दिल्यास दुरुस्ती
‘घटबारी’मुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून, त्यामुळे यावर्षी शेतीत पिके चांगली आली आहेत. शासकीय स्तरावरून नुकसानभरपाई मिळाली, तर तो पैसा आम्ही घटबारी जलसंधारण समितीकडे सुपूर्द करून धरणाचे उर्वरित काम करू, अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी उत्तम हेमाडे, दशरथ हेमाडे, राजसबाई हेमाडे, दादाजी गवळे, हिलाल गवळे आदींनी दिली.

आमदार, खासदारांबाबत नाराजी
घटबारी धरण फुटल्यानंतर व त्याची पुन्हा उभारणी झाल्यानंतर ‘पाहणी दौरा’ व ‘आश्वासने’ याव्यतिरिक्त काहीही ठोस भरीव मदत मतदारसंघातील आमदार व खासदारांकडून आम्हाला मिळाली नाही, अशी जाहीर नाराजी खुडाणेकरांनी आमदार डी. एस. अहिरे व खासदार डॉ. हीना गावित यांच्याविषयी व्यक्त केली. दरम्यान, श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुरू केलेल्या ‘घटबारी’च्या कामाचे पहिले सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्यामुळे आमच्या या लोकसहभागातून सुरू केलेल्या चळवळीला अधिक बळ मिळाले, अशी प्रतिक्रिया खुडाणेचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे पराग माळी यांनी दिली.

आजपर्यंत शासनाने आपल्या तिजोरीतून या कामासाठी एक दमडीसुद्धा आर्थिक मदत दिलेली नाही. ही अतिशय खेदाची व लाजीरवाणी बाब आहे.
- नामदेव गवळे, उपसरपंच, खुडाणे, ता. साक्री

खुडाणेवासीयांनी लोकसहभागातून अहोरात्र परिश्रम घेऊन पूर्ण केलेल्या या कामाची शासनाने साधी दखलही घेतली नाही. उलट पुरस्कार देताना आम्हाला डावलले. सापत्न वागणूक दिली.’
- कन्हय्यालाल काळे, ग्रामपंचायत सदस्य, खुडाणे

अवघ्या आठ महिन्यांत लोकवर्गणी, लोकसहभाग व श्रमदानातून धरणनिर्मिती ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खुडाणे ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत.
- गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, धुळे

प्रत्येक काम हे शासनानेच केले पाहिजे, अशी अपेक्षा न ठेवता ‘घटबारी’सारखी आदर्शवत कामे ही ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकसहभागातून केली पाहिजेत. तसा आदर्श खुडाणेकर ग्रामस्थांनी निर्माण केला आहे.
- संदीप भोसले, तहसीलदार, साक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com