पदवीधरांचे दुर्लक्षित प्रश्‍न सोडविणार - पाटील

निफाड - येथील विद्यालयात कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलतांना नाशिक पदविधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील. उपस्थित पदविधर मतदार व कार्यकर्ते.
निफाड - येथील विद्यालयात कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलतांना नाशिक पदविधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील. उपस्थित पदविधर मतदार व कार्यकर्ते.

नाशिक - पदवीधरांच्या प्रश्‍नांचा अभ्यास व नेमक्‍या उपाययोजनांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. आजवर कोणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने प्रशिक्षण, रोजगार व त्यांचा आत्मसन्मान दुर्लक्षित राहिला आहे. येत्या निवडणुकीत या प्रश्‍नांना दिशा देण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. 

डॉ. प्रशांत पाटील यांनी विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह निफाड तालुक्‍यात विविध मोठी गावे आणि तेथील शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन प्रचार केला. या वेळी विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत कर्मचारी, शिक्षक, तसेच पदवी घेऊन बाहेर पडणारे युवक या सगळ्यांच्या मूलभूत समस्यांचा बोध आजवर प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना झालाच नाही. त्यामुळे शासनाकडे त्याची मांडणी करून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. यासाठी सध्याच्या सरकारशी समन्वय असलेल्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. पदवीधरांनी पहिल्या पसंतीचे मतदान यंदा भाजपला करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

चांदोरी, सायखेडा, निफाड, पिंपळद यांसह विविध महत्त्वाच्या गावांतील शाळा, महाविद्यालये, तसेच पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी निफाडला न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांशीही संपर्क साधून मतदानाचे आवाहन करण्यात आले. मतदारांना पत्रके वाटण्यात आली. प्रमुख मतदारांच्या भेटीगाठी घेऊन जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन उमेदवार डॉ. पाटील  यांनी केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या दौऱ्यात निफाड भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आदेश सानप, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, तालुका सरचिटणीस वैकुंठ पाटील, शरद नाथे, उमेश नागरे, महेश बिरी, श्रीनाथ कडभाने, विलास मत्सागर, विनायक खालकर, शंकरराव वाघ आदी सहभागी झाले.

डॉ. प्रशांत पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा 
नाशिक - विधान परिषदेच्या पाचही जागांसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) घेण्यात आला आहे. त्यात नाशिक पदवीधर मतदारसंघातील डॉ. प्रशांत पाटील यांचा समावेश आहे, असे पक्षाचे नेते सुरेश बारशिंग यांनी आज येथे सांगितले. पाठिंब्याच्या बदल्यात महापालिकेसाठी १६ जागांची मागणी केली आहे. स्वीकृत पदावर तिघांना संधी मिळत असतानाच सरकारी समित्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देणार आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, प्रियकीर्ती त्रिभूवन, जगन्नाथ बावा, विश्‍वनाथ काळे, फकिरा जगताप, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com