कडधान्याच्या उत्पादनात यंदा दुप्पट वाढ

कडधान्याच्या उत्पादनात यंदा दुप्पट वाढ

चांगल्या पावसाचा परिणाम; ‘जलयुक्त’ची कामेही ठरली उपयुक्त

जळगाव - गेली दोन वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यंदा कडधान्याचे पेरणीक्षेत्र तर वाढलेच आहे, शिवाय यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कडधान्याच्या प्रतिहेक्‍टरी उत्पादनातही चांगलीच वाढ झाली आहे. तूर, उडीद, सोयाबीन, मूग यासारख्या पिकांचे प्रतिहेक्‍टरी उत्पादन तब्बल दुपटीने वाढल्याने शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती होती. त्यामुळे त्याचा एकूण परिणाम अन्न-धान्याच्या उत्पादनावर झाला. कडधान्याचे उत्पादनही गेल्या दोन-तीन वर्षांत घटल्याने डाळींचे दर गगनाला भिडले. त्यामुळे गेल्या पावसाळ्याकडून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठी अपेक्षा होती. पावसाने ती अपेक्षा पूर्ण केली आणि सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. 

दुसरीकडे शासनानेही विशेषत: कडधान्य उत्पादन वाढावे म्हणून विशेष प्रयत्न केले. 

कृषी विभागाच्या माध्यमातून पेरणीक्षेत्र वाढीसह उत्पादन वाढीसाठी काही योजना राबविण्यात आल्या. तूरलागवडीत तर कृषी विभागाने विशेष योजना राबवून तुरीची तयार रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. त्यामुळे तूरलागवडीचे क्षेत्र वाढून आता त्याचे उत्पादनही वाढणार असून यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन होईल, असा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे पाऊस तर चांगला झालाच, शिवाय जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळे भूजल पातळी वाढली तसेच, कोरड्या पडलेल्या विहिरींनाही पाणी आल्यामुळे त्याचाही सकारात्मक परिणाम उत्पादनावर झाला आहे. तूरसह उडीद, सोयाबीन, मूग, हरभरा या सर्वच पिकांचे उत्पादन वाढले आहे.

यंदाच्या हंगामात कडधान्याचे पेरणीक्षेत्रही वाढले होते. त्यानुसार उडदाचे पेरणीक्षेत्र ४२ हजार २४८ हेक्‍टर, मूग ४४ हजार ४००, तूर २१ हजार १२५ तर सोयाबीनचे पेरणीक्षेत्र ४१ हजार ११० हेक्‍टर होते. 

तूर उत्पादनाबाबत जिल्ह्यातील केवळ अमळनेर तालुक्‍याची आकडेवारी कृषी विभागाकडे प्राप्त असून या तालुक्‍यात प्रतिहेक्‍टरी ५७५.८३ किलोग्रॅम/हेक्‍टर उत्पादन आले आहे. उर्वरित तालुक्‍यांची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर सरासरी उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे.

पीकनिहाय उत्पादन (प्रतिहेक्‍टरी किलोग्रॅम)
पीक --------- २०१५-१६------ २०१६-१७
उडीद ---------२८२.८९--------६८९.७८
मूग -----------२८०.३२--------६४२.४७
सोयाबीन--------६३६.२६--------१७६६.६८
तूर ------------४५५.१२--------५७५.८३ 
                       (आकडा अपूर्ण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com