युरोपीय राष्ट्रांमध्ये होणार द्राक्ष आणि वाइनचे मार्केटिंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

'वाइन कॅपिटल'मधील समूहाच्या बौद्धिकसंपदेवर माहितीपट

'वाइन कॅपिटल'मधील समूहाच्या बौद्धिकसंपदेवर माहितीपट
नाशिक - देशाची "वाइन कॅपिटल' म्हणून नाशिकने जगाच्या नकाशावर आपले स्थान अधोरेखित केले आहे. येथील मातीसह पाण्याचा गुणधर्म, शेतकऱ्यांचे कष्ट अन्‌ वाइनची निर्मिती यावर आधारित माहितीपट तयार करण्यासाठी युरोपातील पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. वाइन कॅपिटलमधील समूहाच्या बौद्धिकसंपदेवर आधारित हा माहितीपट मेमध्ये थायलंडमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात प्रदर्शित केला जाणार आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये द्राक्षांसह वाईनच्या मार्केटिंगसाठी हे आश्‍वासक पाऊल असल्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गणेश हिंगमिरे यांनी "सकाळ'ला सांगितले.

माहितीपटासाठी युरोपामधून अलवोरो ओलावामिया, बॅटीश मिगनेल, जोसेफ अलमिनर, झिमो फर्नांडिस, मॅन्युअल पास्कल, जव्हिअर सनचेझ, ऍना ऑरोझको यांचे पथक दाखल झाले आहे. जागतिक व्यापार संघटनेने वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व्यासपीठ तयार करून दिले आहे. युरोपीय राष्ट्रसंघ आणि भारत सरकार यांच्यात त्यासंबंधाने करार झाला आहे. देशातील दहा पदार्थांचा समावेश असून त्यात नाशिकची वाइन, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे कोकम हे महाराष्ट्रातील तीन घटक आहेत.

द्राक्षे आणि वाइनवरील आधारित माहितीपट थायलंडमधील प्रदर्शनानंतर युरोपीय राष्ट्रांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे "दार्जिलिंग चहा'पाठोपाठ वाइन कॅपिटल जागतिक बाजारपेठेत धूम करणार आहे. सह्याद्री पर्वतरागांमधील ब्रह्मगिरीच्या कुशीतून गोदावरी उगम पावते. ती नाशिककरांना समृद्ध करत पुढे जाते. येथील मातीत तयार होणारी द्राक्षे जागतिक दर्जाची असून, जगभरातील ग्राहकांच्या जिभेवर रुळणाऱ्या दर्जेदार वाइनची निर्मिती होते. ही सारी वैशिष्ट्ये या माहितीपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोचण्यास मदत होणार आहे.

'युरोपातील ब्रॅंडिंगमुळे शेतकऱ्यांना द्राक्षांसाठी खात्रीशीर भाव मिळण्यास मदत होणार आहे. नाशिकमधील द्राक्षांसह वाइनसाठी बाजारपेठ विस्ताराची संधी यानिमित्त उपलब्ध झाली आहे. ''
- गणेश हिंगमिरे, भौगोलिक उपदर्शनविषयक राष्ट्रीय पुरस्कारविजेते

Web Title: grapes & wine marketing in foreign country