आखातामधील निर्यातीसाठी मुंबईत कक्षाची स्थापना - खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

नाशिक - आखाती देशांमध्ये होणाऱ्या शेतमाल निर्यातीमध्ये आयातदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबईत कक्ष स्थापन करण्यात येईल. त्यात दुबईमधील आयातदार, मुंबईतील निर्यातदार, "अपेडा', शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी व पणन विभाग प्रतिनिधींचा समावेश असेल, असे कृषी, फलोत्पादन पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी स्पष्ट केले.

दुबईमधील आंतरराष्ट्रीय "गल्फ फूड' प्रदर्शनाची पाहणी करून भारतीय दूतावासामध्ये संवाद साधताना ते बोलत होते. कडधान्य, अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, तेलबिया, फळे, भाजीपाला, प्रक्रिया पदार्थ, मांस-पोल्ट्री, विविध पेये यांचा प्रदर्शनात समावेश आहे. भारतातील विविध कंपन्या "अपेडा'च्या माध्यमातून प्रदर्शनात सहभागी झाल्या. त्यात महाराष्ट्रातील काही कंपन्यांचा समावेश आहे. प्रदर्शनांतर्गतच्या अमेरिका, बांगलादेश, स्पेन, पाकिस्तान, इटली, सौदी अरेबिया, जर्मनीच्या स्टॉलला खोत यांनी भेट दिली. महाराष्ट्रातील 900 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये शेतमालाची निर्यात करण्यासंबंधी दुबईमधील भारतीय दूतावासचे राजदूत अनुराग भूषण यांची खोत यांनी भेट घेतली. प्रक्रिया उद्योगास चालना मिळण्यासाठी आखाती देशांमधील गुंतवणूकदार उपलब्ध झाल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाठबळ मिळेल आणि शेतकरी निर्यातीत भर घालतील, असे खोत यांनी सांगितले. त्याचवेळी इच्छुक गुंतवणूकदारांची बैठक मुंबईत घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आखाती देशांमधील मराठी उद्योजक धनंजय दातार यांची खोत यांनी भेट घेतली. त्यांनाही कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या चर्चेसाठी निमंत्रित केले. अल्‌ अदिल समूहाचे सरव्यवस्थापक देशपांडे यांनी कराड परिसरात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने प्रक्रिया उद्योग उभारणीत गुंतवणूक करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खोत यांनी सांगितले.