पत्नीच्या छळाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

ओझर (जि. नाशिक) - पत्नी आणि सासऱ्याच्या छळाला कंटाळून "एचएएल'च्या कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीआधारे ओझर पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 19 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संतोष मच्छिंद्र पवार "एचएएल'मध्ये नोकरीस होते. त्यांनी राहत्या घरात रात्री दोनच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत मृत संतोष यांचे मोठे बंधू सचिन पवार (वय 28, रा. पुणे) यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपल्या भावाचा त्याची पत्नी प्रिया संतोष पवार आणि सासरे विष्णू शिंदे (रा. मुलुंड), चुलत सासरे कृष्णाजी शिंदे (रा. गाजरवाडी, ता. निफाड), आप्पासाहेब बोरगुडे (रा. नैताळे) यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली. लग्नाआधी प्रियाच्या शिक्षणाबाबत खोटी माहिती सांगून संतोषची फसवणूक केली होती. संतोषला सासरी बोलावून प्रियाच्या नातेवाइकांनी दोन-तीनदा मारहाण केली होती. त्याला ठार करण्याची धमकीही दिली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

पोलिसांनी संशयित विष्णू शिंदे, कृष्णाजी शिंदे, अप्पासाहेब बोरगुडे, प्रिया संतोष पवार या चौघांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता यातील कृष्णाजी शिंदे आणि अप्पासाहेब बोरगुडे यांना 19 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.