एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

हनुमान जयंतीदिनी जयघोष; अनेक ठिकाणी ‘भंडारा’
जळगाव - आरती किजीए हनुमान लल्ला की..., अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान... एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान...’ अशी हनुमंतवंदना करणारी भक्तिगीते पहाटेपासूनच कानी पडत होती. तसेच ‘पवनपुत्र हनुमान की जय...’चा जयघोष करीत शहरासह परिसरात हनुमान जयंतीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

हनुमान जयंतीदिनी जयघोष; अनेक ठिकाणी ‘भंडारा’
जळगाव - आरती किजीए हनुमान लल्ला की..., अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान... एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान...’ अशी हनुमंतवंदना करणारी भक्तिगीते पहाटेपासूनच कानी पडत होती. तसेच ‘पवनपुत्र हनुमान की जय...’चा जयघोष करीत शहरासह परिसरात हनुमान जयंतीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

हनुमान जयंती असल्याने शहरातील हनुमान मंदिरांत आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम झाले. जिल्हा परिषदेसमोरील पत्र्या मारोती, गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान, शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान, रथ चौकातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर यांसह कॉलनी- परिसरातील मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच हनुमान मूर्तीचे विधिवत पूजन, रामनामाचे स्मरण, हनुमान जन्मोत्सव सोहळा व महाआरती, सुंदरकांड वाचन असे कार्यक्रम झाले. आज दिवसभर ठिकठिकाणी हनुमान चालिसा पठण, भक्‍तिगीत सुरू असल्याने वातावरण भक्‍तिमय झाले होते.

दर्शनासाठी गर्दी
पहाटे पाचपासूनच अभिषेक, आरती व जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरांत सुंदरकांड, गीतरामायणातील चालींवरील भक्तिगीतांसह भजन, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पठण आदी कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सकाळी आणि सायंकाळी सहानंतर मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विविध मंदिरे व संस्थानच्या व्यवस्थापनातर्फे मंडप, आकर्षक रोषणाई, सजावटीसह मंदिर आवारात आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

शहरात अनेक ठिकाणी ‘भंडारा’
हनुमान जयंतीनिमित्त शहरात आज विविध भागांतील हनुमान मंदिरांमध्ये भंडाऱ्याचे (महाप्रसादाचा) कार्यक्रम झाले. काही मंडळ, स्वयंसेवी संस्थांतर्फे रामभक्‍त हनुमानाची प्रतिमापूजन, सत्यनारायण पूजा ठेवून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यासाठी खास खानदेशी मेनू वांग्यांची भाजी, वरण-बट्टी, भात आणि गोड म्हणून मोतीचूरचे लाडू, शिरा असा बेत अनेक मंडळांनी केला होता. भाविकांनी आज दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला. शहरातील जुने जळगाव, स्वातंत्र्य चौक, शिवाजीनगर, शाहूनगर, औद्योगिक वसाहत, गोलाणी मार्केट परिसरात आज झालेल्या ‘भंडारा’ कार्यक्रमात अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
 

अवचित हनुमान मंदिरात प्रसादाचे वाटप
नेहरू चौक बहुद्देशीय मित्रमंडळातर्फे अवचित हनुमान मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. याशिवाय, भक्‍तांच्या स्वागतासाठी दोन स्वागत गेट लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पोहे व जिलेबीचा प्रसादवाटप करण्यात आला. पहाटे चारपासून प्रसादवाटप करण्यात आला. त्याचा दहा हजारांपेक्षा अधिक भाविकांनी लाभ घेतला. यासाठी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, योगेश पाटील, दीपक सैंदाणे, अमोल भावसार, राहुल पाटील, आकाश राजपूत, राजू भावसार, डॉ. अश्‍विन काष्णुके आदींनी सहकार्य केले.