‘आजारी’ आरोग्य यंत्रणा उठली रुग्णांच्या जीवावर!

सचिन जाेशी
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या क्रांतीने एकीकडे जगात मंगळावरील सृष्टी शोधण्याचे प्रयत्न होत असताना, दुसरीकडे भारतासारख्या म्हणायला विकसनशील राष्ट्रांतील जनतेला आरोग्याच्या मूलभूत सुविधेसाठीही संघर्ष करावा लागतोय; किंबहुना या सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उपचाराअभावी किरकोळ आजारानेही लोकांचा बळी जात आहे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? सध्या देशभरात, राज्यात आणि पर्यायाने जळगाव शहरासह जिल्ह्यातही डेंग्यू या साथरोगाने थैमान घातले आहे.

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या क्रांतीने एकीकडे जगात मंगळावरील सृष्टी शोधण्याचे प्रयत्न होत असताना, दुसरीकडे भारतासारख्या म्हणायला विकसनशील राष्ट्रांतील जनतेला आरोग्याच्या मूलभूत सुविधेसाठीही संघर्ष करावा लागतोय; किंबहुना या सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उपचाराअभावी किरकोळ आजारानेही लोकांचा बळी जात आहे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? सध्या देशभरात, राज्यात आणि पर्यायाने जळगाव शहरासह जिल्ह्यातही डेंग्यू या साथरोगाने थैमान घातले आहे. घरातील व घरासभोवतालच्या अस्वच्छतेची स्थिती लक्षात घेता नागरिकांचा निष्काळजीपणा दिसत असला, तरी शहरी व ग्रामीण भागातील स्वत:च ‘आजारी’ असलेली यंत्रणाही डेंग्यूच्या जीवघेण्या प्रसाराला पूरक ठरत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 
 

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून ‘डेंग्यू’सह अन्य साथरोगांनी थैमान घातले आहे. आतापर्यंत शहरातील दोघांसह जिल्ह्यातील चौघांचा ‘डेंग्यू’मुळे, तर आणखी काही रुग्णांचा ‘डेंग्यू’सदृश आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य यंत्रणेच्या दप्तरी आहे. अर्थात, प्रत्यक्षात ‘डेंग्यू’ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आणखी असू शकते, हे नाकारता येणार नाही. ‘डेंग्यू’चा डंख तीव्र होऊन त्यामुळे रुग्णांचा बळी जाण्यापर्यंत स्थिती गंभीर बनलेली असताना आपली आरोग्य यंत्रणा ‘डेंग्यू’ कसा होता, का होतो, कोणत्या डासामुळे होतो, तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात लागली आहे. अर्थात, prevention is better than cure नुसार ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल दुमत नसावे. मात्र, ऐन पावसाळ्यात पालिकांची व ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ‘डेंग्यू’चा प्रसार रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजना पुरेशा आहेत काय? हे तपासून घेणे गरजेचे आहे. 

सुरवातीच्या काळात आरोग्ययंत्रणेत स्वतंत्र मलेरिया विभाग होता, आजही तो आहे. मात्र नावालाच! मलेरिया विभाग अगदी तिन्ही ऋतूंमध्ये सक्रिय राहायचा. शहरातील विविध भागांतच नव्हे, तर ग्रामीण भागातही डबके, उकिरडे असलेल्या भागात या विभागाकडून जंतुनाशक फवारणीसह धूर फवारणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जायचे. गेल्या काही वर्षांत ही प्रक्रिया अचानक बंद झाली. ‘आग लागल्यावर पाणी आणण्यासारखी’ रोग पसरल्यावर उपचार करण्याची अजब प्रथा सुरू झाली. जळगाव शहरात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने आता कुठे यंत्रणा कामाला लावून सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र, ही यंत्रणाही शहरातील संपूर्ण भागात पोहोचू शकलेली नाही, तशी ती पोहोचणे शक्‍यही नाही. ‘डेंग्यू’ व अन्य साथरोगांच्या पार्श्‍वभूमीवर केवळ काहीतरी उपाययोजना केल्या जात आहेत, हे दर्शविण्याइतपत या यंत्रणेच्या ‘हालचाली’ सुरू आहेत. प्रत्यक्षात साथरोगांचा विळखा इतका घट्ट झालाय, की प्रत्येक घरात कोणत्या न कोणत्या रोगाचा एकतरी रुग्ण आढळून येत आहे. ग्रामीण भागातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. 

जळगाव शहरात नागरी सुविधांचा उडालेल्या बोजवाऱ्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात असले, तरी यामुळे स्वच्छतेची समस्या सर्वाधिक प्रभावित झाली आहे. महापालिकेची व्यापारी संकुले, विविध प्रभागांमधील खुल्या जागा, सखल भागातील डबके, ओव्हरफ्लो होणारी गटारे, नाल्यांची न झालेली सफाई यामुळे स्वच्छता व आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. किमान प्राथमिक उपाययोजना करताना स्वच्छतेबाबत ही काळजी घेतली तर आहे ते साथरोग नियंत्रणात येतील, असे मानायला हरकत नाही. मात्र, आरोग्ययंत्रणाच मनाने आणि सुविधांनी ‘आजारी’ असेल तर ती नागरिकांच्या आरोग्याची काळजी कशी घेणार? आणि हीच ‘आजारी’ आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या जिवावर उठल्याचे डेंग्यूच्या प्रसाराच्या निमित्ताने समोर येत आहे.