वाढत्या उन्हापासून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

दीपक खैरनार
शनिवार, 21 एप्रिल 2018

तापमानात मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक वाढ झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. वैशाख महिन्यानंतर संक्रमण होत असून सूर्य हा पृथ्वीजवळ आलेला असतो. यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची दाहकता अधिक प्रमाणात अनुभवास येते.

अंबासन (जि.नाशिक) : कांदा उत्पादनाचे प्रमुख आगार म्हणून देशच नव्हे तर संपूर्ण जगभरात ओळख असलेल्या कसमादे परिसरातील वातावरणात अचानक बदल झाला असून, गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. या उष्णतेमुळे जनतेसह मुके प्राणी सुद्धा हैराण झाले असून तपमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढण्यासाठी शेतीमध्ये मग्न असल्याने कांद्याला वाढत्या उष्णतेची मोठी झळ बसत आहे. अनेक शेतकरी शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा उन्हापासून बचाव करण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे.

तापमानात मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक वाढ झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. वैशाख महिन्यानंतर संक्रमण होत असून सूर्य हा पृथ्वीजवळ आलेला असतो. यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची दाहकता अधिक प्रमाणात अनुभवास येते. या प्रचंड उष्णतेमुळे मनुष्यप्राण्यांबरोबरच वन्यप्राणी, पशुपक्षीही कासावीस झाले आहेत. सध्या वातावरण सतत बदलत आहे. पहाटे हवेत काही प्रमाणात गारवा असतो व दिवसभर मात्र प्रचंड ऊन असे वातावरण तयार होत आहे. अचानक एवढी प्रचंड उष्णता हवेत निर्माण झाली आहे. सकाळी आठ वाजताच उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे.

दुपार होताच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे सर्वत्र उन्हाची रणरण पाहवयास मिळत आहे. यामुळे माणसेच काय जणावरांचा जीव कासावीस होत आहे. उन्हाच्या या काहिलीपासून बचावासाठी कांदा उत्पादक शेतकरी शेतातील साठवून ठेवलेल्या कांद्याला कांद्याची पात, ताडपत्री व झाडांच्या डहाळ्या तोडून त्यावर टाकीत आहेत. तर अनेक जण घरात वातानुकूलन यंत्र लावून किंवा पंखे लावून बसणे नागरिक पसंत करीत आहेत. घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसत नसून रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती अनुभवास येत आहे.

उष्माघाताचा धोका वाढला...

प्रचंड उष्णतेमुळे उन्हात पुरेशी काळजी घेतली नाही तर मात्र उष्माघात होण्याचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून स्वतः चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जण घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून तर महिला स्कार्फ बांधून घराबाहेर पडत आहेत.

तापमानापासून बचाव करण्यासाठी बाजारात टोप्या व स्कार्फला मागणी वाढत आहे. याचबरोबर घरात गारवा मिळविण्यासाठी कुलर, एसी व फॅनलाही मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाच्या खरेदीसाठी सुद्धा गर्दी वाढली आहे. 

Web Title: Heavy Heat Farmers Saving Their Onion