धूणीभांडी करून हेमांगीने मिळवले 78 टक्के गुण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सटाणा : घरात अठराविश्व दारिद्र्य. आठ वर्षांपूर्वी वडिलांचे झालेले निधन. आई घरोघरी धुणीभांडी तर दोघे भाऊ देखील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःही दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या येथील हेमांगी रमेश महाजन या विद्यार्थिनीने ७८.३० टक्के गुण मिळवत स्पर्धेच्या काळात आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तिची यशोगाथा प्रेरणादायी असून आजच्या विद्यार्थिनींसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे.

सटाणा : घरात अठराविश्व दारिद्र्य. आठ वर्षांपूर्वी वडिलांचे झालेले निधन. आई घरोघरी धुणीभांडी तर दोघे भाऊ देखील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःही दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या येथील हेमांगी रमेश महाजन या विद्यार्थिनीने ७८.३० टक्के गुण मिळवत स्पर्धेच्या काळात आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तिची यशोगाथा प्रेरणादायी असून आजच्या विद्यार्थिनींसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे.

येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या हेमांगीने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या आई - वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी हेमांगीने प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोचण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. शहरातील कचेरी रोडवरील शिंदेवाडा परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असलेल्या हेमांगी महाजन हिचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर होता. वडील रमेश महाजन हे एका हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करायचे. गेल्या आठ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी हेमांगीच्या आईवरच आली. हेमांगीला दोन भाऊ असून एक भाऊ सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई म्हणून तर दुसरा भाऊ रोजंदारीवर काम करून कुटुंबाला हातभार लावतो. तिची आई घरोघरी धुणीभांडीचे काम करते. मात्र घरातील सर्व सदस्य काम करत असताना आपण का मागे राहावे असे म्हणत हेमांगी सुद्धा दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी व शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते. 

शहरातील मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हेमांगीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने 
जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीला हेमांगीने ७५ टक्के तर अकरावीत ८५ टक्के गुण मिळविले होते. कोणतीही खासगी शिकवणी नाही किंवा कोणाचेही वैयक्तिक मार्गदर्शन नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत शाळेच्या प्राचार्या श्रीमती एस.बी.मराठे, उपप्राचार्य एस.जी.भामरे व इतर शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने तिने घरी राहून मोठ्या जिद्दीने अभ्यास करत हे यश मिळवले आहे. महाविद्यालय सुटताच आईला घरकामात मदत करून नंतर घरोघरी धुणीभांडी व शिवणकाम करून तिने परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च तर ती उचलत होतीच, मात्र कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या आई व भावांना आर्थिक मदत देखील करत होती. विशेष म्हणजे बारावीच्या परीक्षा काळात देखील हेमांगीने तिच्या कामातून एकदाही सुट्टी घेतली नाही. 

हुशार विद्यार्थिनींच्या यादीत हेमांगीचे नाव कधीही नव्हते. खासगी शिकवणीचा खर्च कुटुंबियांना पेलवणारा नव्हता. तरीही प्रचंड इच्छाशक्ती व शिकण्याच्या जिद्दीमुळे तिने शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती, एन.टी.एस. व एम.टी.एस. परीक्षांमध्येही यश मिळविले होते. अकरावीत शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर शालेय मंत्रिमंडळात हेमांगीची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शाळेतील आदर्श विद्यार्थिनी म्हणूनही तिचा गौरव करण्यात आल्याने ती शिक्षकप्रिय विद्यार्थिनी देखील ठरली होती. 
मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक डॉ.प्रशांत देवरे, प्राचार्या एस.बी.मराठे, उपप्राचार्य एस.जी.भामरे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तालुक्यातून देखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशासाठी काहीतरी करण्यासाठी आयएएस बनण्याची माझी लहानपणापासून इच्छा आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मी यापुढील काळात जोमाने तयारी करणार असून आयएएस बनण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण करणार आहे.
- हेमांगी रमेश महाजन

Web Title: hemangi got 78 percent she while doing housekeeping